माणूस बना, माणूस जगवा !

माणूस बना, माणूस जगवा !

माणूस बना, माणूस जगवा !

कर्जत-मुंबई मार्गावर भारत सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमधून प्रवास करतो. डोंबिवलीत राहणारा भारत एक सुशिक्षित प्रामाणिक मेहनती युवक. मुंबईत नोकरी करतो. दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेला. लहानसं गोंडस बाळही आहे त्याचं.

एकदा ट्रेनमध्ये अर्ध्या प्रवासात जागा देण्यावरून त्याचं एका गटाशी भांडण होतं. बाचाबाची होते. भांडण मिटतं. पण ते डूख धरून राहतात.

एके दिवशी डोंबिवलीत उतरण्यासाठी दरवाजावरच्या गर्दीत चेंगरलेल्या अवस्थेत तो उभा असतानाच, मागचा माणूस भारतचा हात धरून अचानक ओरडू लागतो, साला पाकीट मारता है, चोर साला.

मूंह संभाल के बात करो. चोर नही हुं मैं, हात हिसकावत भारतचा चढा आवाज.

क्या हो गया भाई साहब., आणखी एक अनोळखी आवाज.

अरे यार पाकीट मार रहा था.

साला दिखता तो शरीफ है

भारत भांबावलेल्या अवस्थेत म्हणतो, आप को कुछ गलतफहमी हुआ है…

तितक्यात त्याच्या पोटात गुद्दा बसतो, गांडो, चोरी करके उपरसे नाटक करता है.

भारत कळवळत काही बोलायला जाणार तितक्यात कोणीतरी डोक्यात झापड मारतं. एकजण मागून काॅलर पकडतो. अबे छोड, असे म्हणेपर्यंत डोंबिवली स्टेशन आलेलं असतं. गर्दी रेटत उतरू लागते. छोडना मत साले को. गर्दीतून आवाज. काॅलर पकडलेल्या अवस्थेतच भारतला उतरवलं जातं. स्टेशनवर उतरल्या उतरल्या त्याच्या कानशिलात बसते. प्रसंग ओळखून तो पोलिसांच्या मदतीसाठी धावू पाहतो. पण चोर चोर आरडाओरडा होतो. फलाटावरची अन्य प्रवासी त्याला पळताना पकडतात. गर्दी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. कुणाची झापड. कुणाचा गुद्दा. कुणाच्या लाथा. रक्तबंबाळ अर्धमेल्या अवस्थेतही मारहाण सुरूच राहते. पोलिस येईपर्यंत गर्दी पांगलेली असते आणि फलाटावर बेवारश्यासारखं निपचित पडून असतं, भारतचं शव !!!

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकते. चॅनलवर ब्रेकींग न्यूज झळकते. चोर समजून निरापराध युवकाचा झुंडीने घेतला बळी !!! चर्चा झडत राहतात आणि शहर हळुहळू पूर्वपदावर येतं.

पण एक कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालेलं असतं. एकुलता एक मुलगा गमावलेले आईबाप अबोल होतात. एक निष्पाप युवती विधवेचं आयुष्य जगण्यास मजबूर होते. एक बाळ बापाविना पोरकं होतं.

याला जबाबदार केवळ झुंड नसते. घटनेभोवतीचे बघेही असतात. शक्य असेल तर मध्यस्थी केली पाहिजे. नसेल, तर पोलिसांना काॅल करून घटनेची कल्पना दिली पाहिजे.

सगळ्यात महत्वाचं… ही घटना काल्पनिक असली तरी ती कोणाच्याही बाबतीत सत्य ठरू शकते.

भारत हा तुमच्यामाझ्या कोणाच्याही घरातला युवक असू शकतो. त्यामुळे मदत करू शकत नसाल तर निदान, झुंडीत कधीही सामील होऊ नका. आज तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला मारताय, पण उद्या कुठेतरी तुमचाही निरापराध मुलगा अशाच पध्दतीने हकनाक मारला जाऊ शकतो. घटना कोणतीही असो, कारण काहीही असो, जातपात, धर्म,भाषा, प्रांत, संस्कृती, कसल्याच बहाण्याने झुंडींचा भाग होऊ नका. स्वतःतली माणुसकी गमावून बसू नका. स्वतःत क्रूर गुन्हेगार जन्माला घालू नका. कुप्रचाराला बळी पडू नका. घाणेरड्या विद्वेषी राजकारणाचे प्रवाहक होऊ नका.

माणूस बना !!! माणूस जगवा !!!

© राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts
comments
  • हे ह्रदय हेलावणारं आहे.

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!