राजकीयदृष्ट्या अंगलट येताच भाजपाची श्रीकृष्णाच्या गीतेशीच फारकत ! हिंदुत्ववादाची पोलखोल !!

राजकीयदृष्ट्या अंगलट येताच भाजपाची श्रीकृष्णाच्या गीतेशीच फारकत ! हिंदुत्ववादाची पोलखोल !!

राजकीयदृष्ट्या अंगलट येताच भाजपाची श्रीकृष्णाच्या गीतेशीच फारकत ! हिंदुत्ववादाची पोलखोल !!

संघ आणि भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्ववाद हा निव्वळ राजकीय आहे, धर्माशी त्याचा काहीही संबंध नाही, हे वेळोवेळी दिसून आलंय. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राजकीयदृष्ट्या अडचणीत आणू शकतील असे चार वर्णांची मांडणी करणारे श्लोक ट्विटरवरून काढून टाकलेत आणि ते पोस्ट केल्याबद्दल चक्क माफी मागितलीय.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दर दिवशी गीतेतील एक श्लोक अर्थासहित ट्वीटरवर पोस्ट करतात. गीतेतील १८ व्या यादीतील ४४ वा श्लोक त्यांनी पोस्ट केल्यावर मात्र त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. विरोधी पक्षांनीही चांगलंच घेरल्यावर सरमा यांनी ट्वीट काढून टाकलं.

मुद्दा असा आहे की स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या नावावर सतत विखार ओकणाऱ्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विरोधकांना घाबरून गीतेतलं ट्वीट काढून टाकण्याची शिवाय केलेल्या ट्वीटसाठी माफी मागण्याची पाळी का आली?

असं काय होतं त्या ट्वीटमध्ये ?

गीतेतला १८ व्या अध्यायातील ४४ वा श्लोक पुढीलप्रमाणे आहे :

कृषीगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्
याचा अर्थ, जो आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमध्ये दिला गेला होता, तो असा होता की,

कृषी, गोरक्षा व व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणं हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे.

भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वर्णन 'अनर्गल बयानबाजी के बेताज बादशाह' असं केलंय. श्रीनेत आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, की हिमंता बिस्वा यांनी ट्वीट काढून टाकलेलं असलं तरी जन्माने माणसांना एकदुसऱ्यापेक्षा कमी लेखणं हीच भाजपाची मूळ विचारधारा आहे.

हिमंता बिस्वा यांनी काढून टाकलेल्या ट्वीटचं खापर आपल्या कार्यकर्त्यावर फोडलंय. श्लोकाचं भाषांतर चुकीचं केलं गेलं, अशी त्यांची सारवासारव आहे. या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असंही ट्वीट स्वत:च्या बचावार्थ त्यांनी केलं.

इथे हिमंता बिस्वा सरमा यांची गोची अशी झालीय की त्यांना थेट कृष्णावर खापर फोडता येत नाही. जर चूक भाषांतराचीच असती तर त्यांनी योग्य भाषांतरासहित पुन्हा ट्वीट केलं असतं. पण जसा मतपेटीचा प्रश्न आला तशी या स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपा नेत्याने चक्क गीतेकडेच पाठ फिरवली.

हिमंता बिस्वा सरमा यांची मागचीपुढची ट्वीटस् तपासली तर लक्षात येतं की केवळ १८ व्या अध्यायातील ४४ वा श्लोकच नव्हें तर ४१ ते ४४ पर्यंतचे ४ श्लोक गायब आहेत. ४० व्या श्लोकानंतर थेट ४५ वा श्लोक आढळतो.

का पळ काढला असेल या श्लोकांपासून ते समजून घेण्यासाठी एकेक श्लोक आणि त्यांचे अर्थ लक्षात घेऊया.

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गृणे:
हे परंतप! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे.

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता - या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्
शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.

कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्
कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.

( ही भाषांतरे भक्तीवेदांत बुक ट्रस्टच्या भगवदगीता - जशी आहे तशी या पुस्तकातून घेतली आहेत. )

ही भाषांतरे पाहता लक्षात येतं की हिमंता बिस्वा सरमा यांची अडचण चुकीच्या भाषांतराची नव्हती तर सत्तास्वार्थी राजकारणाची होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असं हिंदुंचं गीतेत सांगितलेलं वर्गीकरण आज संघभाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. मुसलमानांविरोधात विद्वेष पसरवून हिंदुंची वोटबॅंक तयार करण्याच्या नियोजनात हे वर्गीकरण अडसर आहे. जरी ते भविष्यात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच सगळा राजकीय खटाटोप चाललेला असला तरी सध्याच्या राममंदिर विषयाने बेभान झालेला हिंदू या वर्गीकरणाने भानावर येऊ नये, याची काळजी तथाकथित हिंदुराष्ट्राच्या शिल्पकारांना घ्यावीच लागते.

भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ व १५ नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव करण्यास मज्जाव करतो आणि भगवदगीता समाजाचं जातीआधारित वर्गीकरण करते ! हिंदुराष्ट्रवाल्यांनी खरं तर धर्माशी नातं सांगत ट्वीट काढून न टाकता बिनधास्तपणे भगवदगीतेच्या बाजूने उभं राहायला हवं होतं. पण राजकारण जिंकलं आणि तात्पुरता सोयिस्कररित्या का होईना, धर्म हारला ! 

उलट परिस्थिती विरोधी पक्षांची आहे. गीतेतील चातुर्वण्य हिंदूधर्मातील जातव्यवस्थेचं आणि पर्यायाने विषमतेचं मूळ आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून राजकीय धुंदीत त्याचा पुनर्रुच्चार झाला. विरोधी पक्ष गीतेवर बोट ठेवण्याऐवजी हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करताहेत. भगवदगीतेवर हल्ला चढवून मूळालाच हात घालण्याचं टाळताहेत. इथेही राजकारण आहे. विरोधी पक्ष तरी काय करतील ?

भारतीय नागरिकांची मानसिकताच इतकी बुद्धीबधीर आहे की तेच हिमंत बिस्वांवर मोर्चा काढायला मागेपुढे बघणार नाहीत की परमेश्वराने स्वत: आम्हाला शूद्र ठरवून सेवा हे कर्तव्य सांगितलेलं असताना, तुम्ही त्याच अर्थाचं ट्वीट का काढून टाकलंत ? धर्मात सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढची हजारों वर्षात गुलाम राहायला तयार असताना तुम्हाला काय अडचण आहे ? राममंदिराचा पुजारी इतर तीन वर्णांपैकी नसणारेय, त्यावर आम्ही काही बोललो ? उलट, प्रधानमंत्र्यांनी अपील केल्याप्रमाणे आम्ही २२ जानेवारीला घराघरात श्रीरामज्योती पेटवणार आहोत.

हिंदुराष्ट्र आलं की संविधानातील समानता जाऊन त्या जागी गीतेतली विषमता येणार आहे, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असताना आणि त्यासाठीच सगळा अट्टाहास सुरू असताना शिवाय धर्माभिमानापायी आम्हीही त्याच वाटेवर गप्पगुमान चालत असताना एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याने गीतेतल्या श्लोकांची ट्वीट काढून टाकावीत, यापेक्षा दुसरा धर्मद्रोह काय असू शकतो !

संविधानिक पदावरची व्यक्ती असंविधानिक वागली म्हणून तिच्याविरोधात कारवाई करणारी निदान जाब विचारणारी कुठली यंत्रणा भारतात उरली आहे काय ? देशाच्या संविधानाशी विसंगत विचारधारा ज्या देशातील बहुसंख्यांकाचा धर्मग्रंथ असतो, तिथे संविधानिक / असंविधानिक असा काही फरक असतो का ?

 

 

 

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!