रेल्वे स्टेशनवर एक आजी आशेने बसली होती. येणार्या जाणार्या प्रत्येकाकडे ती काही मागत होती. काही देत होते. काही तिला टाळून जात होते. काहीजण उगीचच तिरपा कटाक्ष टाकत होते. आजी मात्र एकदम निर्विकार होती.
तिचं हात पसरणं न आवडल्यामुळे एकदोघांनी उगीचंच आजीला बोल लावले. आजीला ते अजिबात नाही आवडले. शेवटी ती कळवळून म्हणाली, बाबांनो असं धारदार नका बोलू. देऊ नका काही. थोडा आधार शोधतेय.

"धार नको, आधार हवा." जुनी माणसं भाषा किती वळणदार बोलतात. याची प्रचिती आली. धार शब्दाला केवढी धार आहे. आधारात किती ओढ आहे.
बर्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की, लोक मदत कमी करतात पण सुनावतात मात्र जास्त ; अगदी कारण नसताना, वाईटसाईट बोलून मोकळे होतात. "भीक नको पण कुत्रं आवर" अशी स्थिती होऊन जाते.

एखाद्याची खरंच आपल्याला मनापासून मदत करायची इच्छा असेल तर ती व्यक्ती बोलण्यात वेळ घालवत नाही. थेट मदतच करते. नाही शक्य झालं पण इच्छा असेल तर ती निदान तिला शाब्दिक आधार देण्यात तत्परता दाखवते.
नुसत्या आधाराच्या शब्दांनीच माणसाला धीर येतो. नको तिथे शब्दांना धार देण्यात काहीच अर्थ नसतो. त्याने उगीचच समोरची व्यक्ती विनाकारण दुखावली जाते.

कधी कधी असे प्रसंग येतात की संकट झेलणार्या व्यक्तिलासुद्धा माहित असते की यावर खरंच कुणीही उपाय करू शकत नाहीत. पण तरीही माणसाला इतरांच्या सहानुभूतीची गरज वाटते. मग जर अशावेळी त्याला कुणी वाईट बोललं तर ते मनाला खूप लागतं. आधीच गर्भगळीत झालेला जीव आणखीनच हतबल होतो.
एखाद्याकडून काही चूक झाली की झालं, नुकसान राहिलं बाजूला आणि त्याच्या तशा वागणुकीबद्दल शब्दांची अद्दल घडवण्यात काही माणसं भलताच पुढाकार घेतात.
आपण घटनेच्या मुळात जात नाही. निर्णय देऊन मोकळे होतो. इथे शब्दांना धार येते. अशा शब्दधारेच्या माणसांना माणसं जरा वचकूनच राहतात. पण ती तुटतही जातात.
संवादात मुळात वाद नाही. त्यामुळे तिथे धार नाही. संवादी माणसाशी बोलताना आधार वाटतो. वेल आधाराने वाढते. तिला झिडकारत नाही. तिच्या वाढीची आधाराची सोय निसर्गाने करून ठेवली आहे.

माणसं कुचागळ्या करण्यात का वेळ घालवतात? आजीला का ऐकून घ्यावं लागतं? माणसांची मनं इतकी का धारदार होतात? माणसं का निष्ठूर होतात? या प्रश्नांचे एकच उत्तर आहे, माणसं तुटत चाललीत. आधार घटत चाललाय.
जिथे जिभेला धार आहे तिथे नाती बोथट झालेली आढळतात. समाधान मिळत नाही. जिथे आधार आहे तिथे मात्र भक्कमपणे नाती ताठमानेने उभी असतात.
आपली घरं हसरं चैतन्य निर्माण करणाऱ्या मनोभावी संस्था जेव्हा होतील तेव्हा घरं आधाराने वाढतील. आपण मात्र कायम लक्षात ठेवावं की शब्दात धार नको, आधार हवा.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com