लैंगिक शोषणातील आरोपीला मनसेचं संरक्षण ?

लैंगिक शोषणातील आरोपीला मनसेचं संरक्षण ?

लैंगिक शोषणातील आरोपीला मनसेचं संरक्षण ?

मैत्रकूल ही तथाकथित संस्था सुरू असल्याचा आणि मैत्रकूलचा संस्थापक किशोर जगताप फरार नसल्याचा कितीही आव किशोर जगतापचे समर्थक आणत असले तरी पडघा पोलिस किशोर जगतापच्या मागावर असल्याने कल्याण, माणगांव, वाई इत्यादी ठिकाणचं मैत्रकूलचं काम जवळजवळ ठप्प झालं आहे. परवा भिवंडीतील अतिरिक्त सत्र न्यायालयात किशोर जगतापने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला, पण जामीन मिळाला नाही. आता ६ फेब्रुवारीला जामीन अर्जावर सुनावणी होईल.

किशोर जगताप कुठे लपून बसलाय किंवा कोणाच्या आश्रयाखाली लपलाय, याचा प्राथमिक उलगडा परवाच्या जामीन अर्जावेळी झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधी विभागाचे उपशहर संघटक ॲड. संदीप रामकर यांनी किशोर जगतापचं वकीलपत्र घेतलंय. मनसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी गजानन काळे आणि किशोर जगतापची जवळीक सर्वश्रुत आहे. ॲड. रामकर यांच्या वकीलपत्रामुळे गजानन काळे आणि मनसे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी किशोर जगतापच्या पाठीशी उभी असल्याचं चित्र पुढे आलं आहे.

या संदर्भात लवकरच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गजानन काळेंविरोधात तक्रार करणार असल्याचं पीडित मुलामुलींनी सांगितलं.

मनसे नेता गजानन काळे यांनी मात्र सदर प्रकरणात कोणताही हस्तक्षेत करत असल्याचा इन्कार केलाय. सदर प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून आपण पोलिसांना किंवा अन्य कोणत्याही यंत्रणांना कधीही संपर्क केलेला नाही, असं काळे यांनी म्हटलं आहे.

मैत्रकूल प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी अलिकडेच पडघा पोलिसांची भेट घेतली असता मैत्रकूलमध्ये सध्या कुठेही लहान मुलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

इतकी वर्षं सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा मैत्रकूलचा संस्थापक किशोर जगताप याच्या विरोधात विरार पोलिस ठाण्यात एका युवतीने गंभीर स्वरुपाची तक्रार केल्याने गुन्हा दाखल होऊन, गुन्हा घडल्याचं ठिकाण पडघा पोलिस ठाण्यांतर्गत असल्याने त्या पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनुपमा पाटील सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

किशोर जगतापविरोधात इतरही काही मुलींची तक्रार असून त्यांना या गुन्ह्यात साक्षीदार करण्यात येणार असल्याचं समजतं.‌ फिर्यादी युवतीला घटनास्थळी म्हणजे मैत्रकूलच्या कल्याणातील जागेत सोबत नेऊन पोलिसांनी किशोर जगतापची कार्यपद्धती व गुन्ह्याचं स्वरुप समजून घेतलं आहे. सदरबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

मैत्रकूलच्या सर्व जागांतून अल्पवयीन मुलामुलींना हलवण्यात आलेलं असलं तरी तिथल्या 'सिनिअर्स' म्हणवणाऱ्या किशोर जगतापच्या साथीदारांकडेही पोलिसांनी तक्रारींबाबत विचारणा केली असल्याचं सांगण्यात येतंय. किशोर जगतापच्या कारनाम्यांची कल्पना या 'सिनिअर्स'ना होती का, तसं फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या जबाबातून तसं पुढे येतंय का, ते पाहून आणि माहितीची खातरजमा करून आवश्यकता भासल्यास इतरांनाही सहआरोपी करण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, किशोर जगतापचे कारनामे लोकांसमोर आणण्यात पुढाकार घेतलेल्या एका युवकाविरोधात कल्याणातील महात्मा फुले पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा किशोर जगताप समर्थक महिलेच्या तक्रारीवरून दाखल झाला असल्याचं समजतं. त्यात जगतापविरोधात समाजमाध्यमात लिहिणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यालाही सहआरोपी करण्यात आलं आहे. जगतापविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी हा दबावाचा एक भाग असल्याचं दोघांनीही म्हटलं आहे. पोलिसांना आम्ही चौकशीत संपूर्ण सहकार्य करू आणि तथ्यही समोर आणू, असं त्यांचं म्हणणं आहे. आज त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलंय.

किशोर जगतापचा थांगपत्ता शोधून काढण्यासाठी पोलिसांचे कृतीशील प्रयत्न सुरू असून त्याला लपवून ठेवू शकतील असे जवळचे सहकारी आणि राजकीय पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. किशोर जगताप लवकरच पोलिसांच्या तावडीत असेल, असं पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांनी 'मीडिया भारत' ला सांगितलं.

प्रकरण संवेदनशील असल्याने सविस्तर माहिती देण्याचं पडघा पोलिस टाळत असले तरी, समाजमाध्यमात किशोर जगतापची बाजू घेऊन लिहिणाऱ्यांना स्वत: किशोरच मजकूर तयार करून देतो, अशी माहिती प्राप्त झाल्याने अशा पोस्टकर्त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांच्या बोलण्यातून ध्वनीत होत आहे. किशोर जगतापसोबतचे सिनिअर्स मौन पाळून असून इतर लहान मुलांना समाजमाध्यमात किशोरची बाजू मांडण्यासाठी पुढे करण्यात आलंय. किशोरविरोधातील आरोपांत तथ्य नसल्याचं ही समर्थक मुलं मांडत आहेत. या मुलांनाही चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आलेल्या तक्रारींवर काय भूमिका निभावली, याचीही पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी मैत्रकूलविरोधातील गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करून आपले हितसंबंध जपण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप असून, त्याबाबत तथ्यता तपासण्यासाठी सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी सांगितलं.

मैत्रकूल आणि किशोर जगताप यांचा पूर्वेतिहास, कार्यपद्धती, निधी संकलन, निधीचा विनियोग, इतर आक्षेपार्ह बाबी व कारनाम्यांबाबत माहिती देण्यासाठी लोकांनी पुढे यावं व पडघा पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांना भेटून चौकशीत सहकार्य करावं, अशी पोलिसांची अपेक्षा असल्याची माहिती पोलिसांच्या भेटीनंतर राज असरोंडकर यांनी दिली आहे.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!