लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाला विरोध करणं ठाण्यातील एका युवकाला चांगलंच महागात पडलं असून, सदर विरोधानंतर झालेल्या वादावादीचं पर्यवसान युवकाला बेदम मारहाण होण्यात आणि अंतिमतः त्याच्या बेपत्ता होण्यात झालंय. गुढी पाडव्यादिवशी ही घटना घडलीय. महिना उलटला तरी कुटुंबियांना व पोलिसांनाही युवकाचा ठावठिकाणा लागलेला नाही.
अभिषेक स्नेहा राणे हा चाळीशीतला युवक ठाण्यातील ढिकोळी येथील आबान पार्कमध्ये राहत होता. आशीष इमारतीतील बी विंगमधील तळमजल्यावर क्रॅस्टो यांचा तो भाडेकरू होता. ठाण्यातच शिवाईनगर येथे आईवडिलांचं घर होतं. वडिल नाट्यकलावंत तर आई लेखिका अशी अभिषेकला कलासाहित्य क्षेत्राची पार्श्वभूमी ! तो स्वत:ही एक चांगला कवी !

कोविड संकटकाळात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर इतरांना त्रास न देता संगणकावर रात्रभर काम करायला मिळावं, यासाठी अभिषेकने आबान पार्कमध्ये भाड्याने घर घेतलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून तो तिथे राहत होता. सुरुवातीला आई आणि बहिण त्याच्यासोबत होते. पण अलिकडच्या काळात तो एकटाच राहत होता.
२ एप्रिलला गुढी पाडव्याला आबान पार्कमधील आशीष इमारतीची सत्यनारायणाची महापुजा होती. रात्री जागून सकाळी आराम करणं हा अभिषेकचा नित्यक्रम असल्याने पुजेजवळचा लाऊडस्पीकरचा आवाज त्याला व्यत्यय ठरणार होता. सोसायटी प्रांगणात एक तयार मंच होता. तिथे पुजा करावी, असं अभिषेकचं म्हणणं होतं. पण आयोजक ठरल्या जागीच पुजा करण्यावर अडून होते. कोविड संकटकाळात पुजा होऊ न शकल्याने असा विरोधाचा प्रसंग आधी उद्भवला नव्हता.

विरोधाचं पर्यवसान वादावादीत आणि परिणती सोसायटीतील लोकांनी अभिषेकला बेदम मारहाण करण्यात झाली. इतकी की जेव्हा तो मारहाणीतून जीव वाचवून पळाला तेव्हा तो केवळ अंडरवेअरवर होता. अभिषेक पोलिसांत जाईल ही सोसायटी सदस्यांना भीती होती ; त्यामुळे सर्वजण घाईघाईने कापुरबावडी पोलिस ठाण्यात गेले व तिथे गुलाब लोहार यांच्या तक्रारीवरून अभिषेकविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. वादावादीत अभिषेक याने लोहारांना चापटी मारली, तेव्हा ते खाली पडले आणि त्यांना किरकोळ जखम झाली, असं तक्रारीत म्हटलेलं आहे.
अभिषेक मात्र पोलिस ठाण्यात पोहचला नव्हता. तो कुठे गेला कोणालाच कळलं नाही. कोलशेत भागात दिसला म्हणून कोणीतरी सांगितल्यावरून आईवडिलांनी अख्खा कोलशेत परिसर पिंजून काढला. अनेकांकडे विचारणा केली. पण तो सापडला नाही. साईबाबांचा भक्त आहे, कदाचित भूकेची सोय होईल म्हणून शिर्डी पदयात्रेत गेला असेल, अशी शक्यता धरून अभिषेकच्या वयोवृध्द आईवडिलांनी रातोरात स्कूटरवर शिर्डी गाठलं. रस्त्यात साईभक्तांच्या प्रत्येक समूहाकडे विचारणा करत करत त्यांनी प्रवास केला. शेवटी त्यांनी कापुरबावडी पोलिसांत अभिषेक हरवल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने शोधमोहिम सुरू ठेवलीय. आईवडिलांनी सर्व शक्यता पडताळून पाहिल्यात. पण अभिषेक कुठेच आढळून आला नाही. एक महिना उलटलाय, अभिषेक बेपत्ता आहे. आईचे रडून रडून हाल झालेत. सोसायटीतील काही सदस्य आणि पोलिसांकडून अभिषेकच्या आई, लेखिका स्नेहा राणे यांना मुलाला झालेल्या मारहाणीची घटना कळलीय. त्यांनीच ती 'मीडिया भारत न्यूज'ला सांगितली.
सोसायटीतील सदस्यांचा अभिषेकवर गंभीर आरोप आहे. गुलाब लोहार यांनी 'मीडिया भारत न्यूज' ला सांगितलं की अभिषेकने आदल्या रात्रीही मंडपवाल्यांना दमदाटी केली होती, इथे मंडप बांधायचा नाही म्हणून ! सकाळी त्याने मांडलेली पुजा उधळली. सामान इकडेतिकडे फेकलं. सत्यनारायणाची तसबीर फोडली. त्यातून वाद चिघळला. अभिषेकने चाकूने हल्ला केल्याचा आरोपही लोहार यांनी केला.
स्नेहा राणे सोसायटी सदस्यांवर उलट आरोप करतात. त्या म्हणतात, मी एकवेळ देवभोळी नाही, पण अभिषेक देवभोळा, श्रद्धाळू आहे. तो पुजा उधळणं शक्यच नाही. सोसायटीतील सदस्यांनी अभिषेकला बेदम मारहाण केलीय, ती आज ना उद्या, त्यांच्या अंगलट येईल, या भीतीने बचावासाठी पुजा उधळल्याची खोटी कथा रचली गेलीय. लोहार यांच्या पोलिसांतील तक्रारीत अशा कुठल्याही घटनेचा किंवा चाकू हल्ल्याचा उल्लेख नाही, याकडे स्नेहा राणे लक्ष वेधतात. माझा लेक एकदा सुरक्षित घरी येऊदेत, मग मी सगळ्यांना कायद्याचा बडगा दाखवते, असंही त्या हुंदका देत देत म्हणाल्या.
कापुरबावडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी अभिषेकचा पोलिस सर्वतोपरी शोध घेत असल्याचं 'मीडिया भारत न्यूज' ला सांगितलं. संबंधित सगळ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून ठाण्यातील अनेक ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अभिषेकला झालेल्या मारहाणीबाबत विचारलं असता, पोलिस निरीक्षक धांडे म्हणाले की आमच्याकडे तशी तक्रार नाही. तपासात पुढे तसं आढळून आल्यास जरूर कारवाई करू ! अभिषेक मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता, असं त्याच्या आईवडिलांनीच सांगितल्याचा दावाही धांडे यांनी केला. पण स्नेहा राणे त्याचा इन्कार करतात. जिथून नेमकी घटना काय घडली हे कळू शकेल, ते सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अजून का मिळवलेलं नाही, असा राणे यांचा सवाल आहे.

अभिषेक अत्यंत हुशार आहे. विज्ञान पदवीधर आहे. गेली दोन वर्षं तो अखंडपणे नियमितपणे कंपनीचं ऑनलाईन काम करतोय. ढोलताशा पथकात तो वावरलाय. पट्टीचा पोहणारा आहे. कविता, गझलांची त्याला आवड ! अलिकडेच 'कोकणनाऊ' या वृत्तवाहिनीवर त्याने कार्यक्रम केलाय, अशी माहिती स्नेहा राणे देतात.

अभिषेक कधी पश्चिम उपनगरात दिसला, कधी माहिमला दिसला, अशी माहिती मिळाली की स्नेहा राणे तब्येतीची पर्वा न करता धाव घेतात. पण तो काही सापडून येत नाही. तो का घरी का परतत नाहीये, कुठे राहतोय, कसा राहतोय, काय खातोय, पितोय...काहीच थांगपत्ता लागत नाहीये. मुलाच्या विरहाने स्नेहा राणेही खंगत चालल्यात. त्यातच, जे कोणी पाहिल्याचं सांगतात, त्यांचं म्हणणं असतं की अभिषेकवर मानसिक आघात झाल्यासारखं वाटतंय. हे ऐकल्यावर स्नेहा राणे अधिक धास्तावतात !
सामान्यांची मिसींगची प्रकरणं पोलिस फार गांभीर्याने घेत नाहीत, असं कोणी म्हटलं की त्या घाबऱ्याघुबऱ्या होतात ! ' तुम्ही शोधून द्याल का हो माझ्या अभिषेकला ? तुमची ओळख आहे का मुख्यमंत्र्यांपर्यंत ?' असं त्यांनी 'मीडिया भारत न्यूज' लाही विचारलं. मला माझा मुलगा शोधून द्या हो, असं त्या काकुळतीला येऊन म्हणाल्या.

राज असरोंडकर
संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज
mediabharatnews@gmail.com