माविमंची प्रागतिक आशयाची उखाणे स्पर्धा !

माविमंची प्रागतिक आशयाची उखाणे स्पर्धा !

माविमंची प्रागतिक आशयाची उखाणे स्पर्धा !

सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचं आयोजन केलं आहे.

उखाणा घेणं हा महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय ! हीच बाब लक्षात घेऊन माविमं च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून उखाणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे.

ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविन्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडिओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे १० सप्‍टेंबर, २०२० पर्यंत पाठवायचा आहे.

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविन्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणं अपेक्षित आहे. उखाणा ‘स्त्री पुरुष समानता’ या मूल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा. अशा अटीशर्ती स्पर्धेसाठी घालण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक आणि माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा ६ याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील, ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६ विभागाचे मिळून ३६ पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ असे ६ क्रमांक काढले जातील.

मात्र, विभागीय स्तरावर ३६ पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या ६ महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र गमरे ( भ्रमणध्वनी क्र.९८९२५४८८५४ ) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाचे संकेतस्थळ www.mavimindia.org वर सर्व जिल्हा कार्यालयांचे संपर्क, संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल उपलब्ध आहेत, असं माविमंने कळवलं आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!