राहुल गांधींना शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचं कुतुहल !

राहुल गांधींना शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचं कुतुहल !

राहुल गांधींना शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचं कुतुहल !

काॅंग्रेस नेता राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेची संघटनात्मक जडणघडण आणि कार्यपद्धती जाणून घेतली. स्वत: संजय राऊत यांनीच ट्वीटरवरून ही माहिती दिलीय. ‘ भाजपाचा अंतकाळ जवळ आला आहे’, अशा आशयाचा सकाळी सामनात अग्रलेख आल्यानंतर, त्यावरची राजकीय वर्तुळातील चर्चा विश्रांती घेते ना घेते, तोच संजय राऊतांनी माध्यमांना राहुल गांधींच्या भेटीचा विषय दिला.

माध्यमं आणि लोकसुद्धा अंदाज बांधताहेत की संजय राऊतांनी शिवसेनेबद्दल राहुल गांधींना नेमकं काय काय सांगितलं असेल, ते किती कुतुहलाने त्यांनी ऐकलं असेल!

मध्यंतरी राहुल गांधींनी एक विधान केलं होतं की जे मोदीशहांना घाबरतात, ते पक्ष सोडतात. घाबरणाऱ्या लोकांना काॅंग्रेसमधून बाहेर काढा आणि जे नीडर आहेत, त्यांना पक्षात घ्या. स्पष्ट आहे की राहुल गांधींना काॅंग्रेस संघटनात्मकदृष्ट्या मजबूत तर करायचीच आहे, पण ती आक्रमकही हवीय. महाराष्ट्रात भाई जगताप, नाना पटोले यांच्या नेमणुकांतून काॅंग्रेसने तो संदेश आधीच दिलाय.

पंजाबात पक्षाची सूत्रं नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे देऊन काॅंग्रेसने आपली दिशाही स्पष्ट केलीय. राजस्थानमध्ये सचिन पायलटना संधी आहे. जुनी खोडं सोबत घेऊन मोदीशहांच्या भाजपासोबत लढणं शक्य नाही, हे राहुल गांधींना कळून चुकलंय.

चौकीदार चोर है, ही मोहिम पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी फारशी उचलून धरली नव्हती, त्यावेळी आपण एकटं पडल्याची व्यथा राहुल गांधींची होती, जी त्यांनी पक्षातही बोलून दाखवली होती. त्यामुळेच २०२४ ला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी त्यांना त्यांची टीम तयार करायचीय.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्रात घट्ट पाय रोवून उभं असलेलं शिवसेनेचं संघटन राहुल गांधींना ना खुणावतं तर नवलच होतं.

शासकीय यंत्रणांचा प्रचंड गैरवापर आणि माध्यमांचा एकतर्फी प्रपोगंडा मोदींसोबत असतानाही, काॅंग्रेसकडे देशातले १२ कोटी स्त्री-पुरुष मतदार आहेत. त्याचं नेतृत्व करायचं, विश्वास टिकवायचा आणि जुना मतदार पुन्हा वळवायचा तर तळागाळापर्यंत संपर्क करणारं संघटन हाताशी हवं. महाराष्ट्रात सद्या तरी अशी राजकीय संघटना शिवसेनाच आहे.

राहुल गांधींनी संजय राऊतांसोबत गप्पांतून राज्यातील राजकारणाची माहिती घेतली, राष्ट्रीय राजकारणावर चर्चा केली, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेविषयीही जाणून घेतलं. त्यात सहजभावही असू शकतो किंवा काॅंग्रेसचं संघटनात्मक रुपडं बदलण्याची हालचालसुद्धा !

काहीही असलं तरी, अगदी शिवसेनाच नाही, पण काॅंग्रेसची मूळ व्यापक विचारधारा अबाधित ठेवून संघटनात्मक पातळीवर पक्षाला उत्साहवर्धक तितकंच आक्रमक रूप देऊ पाहणारी राहुल गांधींची पावलं पडताना दिसत आहेत, हे तितकंच खरं !

 

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!