आपल्या वाणीतून सात्विक शब्दफुलांची पेरणी करत मानवी व्यक्तिमत्व रसिक व सुहृदांच्या अंतःकरणात बीजारोपीत करण्यात मोजक्या लोकांचा हातखंडा असतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे राजेश कदम !
पेशाने प्राथमिक शिक्षक असणारा हा सन्मित्र कवी, चित्रकार, स्नेहतंत्री व सूत्रनिवेदक म्हणून संपूर्ण कोकण पट्ट्यात सुपरिचित आहे. त्याला नुकताच सकाळ माध्यम समूहाने ' IDOLS OF महाराष्ट्र ' हा बहुमोल पुरस्कार देऊन गौरविले आहे.
विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व लोकपयोगी कामाचा लेखाजोखा शब्दबध्द करून तो लीलया जनसामान्यांशी हृदयस्थ करण्याचे कौशल्य साधलेला हा असामी कोकणच्या अद्वितीय व्यक्तिमत्वांच्या मालिकेत गुंफला गेला आहे.

'दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली' ते 'फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग 'असा सामाजिक संघटनेचा विस्तार करतानाच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे दर्पण या संस्थेचे कार्य महाराष्ट्र पातळीवर पोहचवण्यात राजेशचा व्यापक सहभाग आहे.
साहित्यिक चळवळीत सक्रिय असणारा राजेश ' शब्दप्रभू ' म्हणावा इतका भाषेत मुरलेला आहे.
सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग च्या 'प्रसंवाद ' या मुखपत्र निर्माण व संयोजनातही त्याच्या कलादृष्टी व संकल्पना आम्हा मित्रांना नेहमी दिशादर्शक ठरतात.

सकाळ माध्यम समूहासारख्या चोखंदळ वृत्तसेवाश्रुंखलेने राजेशच्या शब्दसेवेची घेतलेली दखल त्याच्या सूत्रसंचालन व सांस्कृतिक वाटचालीतील मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही... सदिच्छा मित्रा !
गुणग्राहक तर आहेसच.. यशवंत हो !
सिद्धार्थ तांबे
कवी तथा प्राचार्य, आरोंदा हायस्कूल, सावंतवाडी