जीवाला चटका लावते ती चित्त पोखरून टाकणारी काळजी. पण माहितीये का काळजी करणं आणि काळजी घेणे यात नेमका फरक आहे .
काळजी करणारे काळजी घेतातच, असं नाही, पण काळजी घेणारे काळजीसुद्धा करतात आणि काळजी घेतातही. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडूनच योग्य कार्य केलं जातं. फक्त काळजी करणारे एकतर चिंतेचा विषय काढून आपली काळजी वाढवतात. आपलाही ते प्रश्न सोडवत नाहीत, उलट प्रश्न आणखी संदिग्ध करत जातात. आपलंच चिंतेचं पाखरु होतं.

काळजी घेणारे मात्र काही न बोलता इतरांना काहीच त्रास न देता स्वतः संकटाला सामोरे जातात. खूप स्थिर राहतात. कोणत्याही कठीण प्रसंगात हातावर हात धरून बसून राहत नाहीत, तर प्रसंगाशी चार हात करतात. कठीण प्रसंगातून सहीसलामत स्वतःही बाहेर येतात आणि दुसऱ्यासही बाहेर काढतात. अशी माणसे कृतिशील असतात .
परिस्थिती अशी आहे की , काळजी करणारे जास्त आणि प्रत्यक्ष काळजी घेणारे फारच मोजके आहेत. त्यामुळेच तर नैराश्य पसरवले जाते. प्रत्यक्ष काळजी घेणारी माणसं उत्तम पॉझिटिव्हिटी पसरवण्याच्या कामी येतात.
अशावेळी मोहम्मद रफींनी गायलेलं , देवानंद यांच्यावर चित्रित झालेलं " मै जिंदगी का साथ निभाता चला गया ! हर फिक्र को धूऐ मे उडाता चला गया !" हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही .

वाट्याला आले आहे ते व्यवस्थित सांभाळणं आणि जे नाहीच मिळालं ते कधी आपलं नव्हतंच, असं म्हणून विसरत जाणं चांगलं. सगळ्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी नसतात. काही पूर्ण होतात तर काहींची सुंदर स्वप्ने होतात. अशा सुंदर स्वप्नात सुद्धा रमायचं असतं. आपलं आपलं आयुष्य जगायचं असतं. उगीचच नुसती काळजी करून मनात मळभ तयार होते .
नुसतीच काळजी करणारे बहुदा व्यसनाधीन होतात, तर काळजी घेणारे नेहमीच इतरांना पंखाखाली घेतात. सुरक्षितता देतात .
दाटून आलेला काळोख कधी ना कधी संपणार आहे. मनातला मळभ दूर होणार आहे, यावर मात्र ठाम विश्वास असायला हवा. आपली आतली शक्ती कायम जागरूक असायला हवी. नुसतीच काळजी करून होतं का?

काळजीने काळीज कापले जाते. त्यापेक्षा अशी काळजी हवी की एकमेकांच्या मनावरची काजळी निघावी. ते कधी साध्य होईल? तर सर्वांनी काळजी घेतली तर. हे जरा अवघडच आहे पण.... अवघड नाही ते व्रत कसले ? काळजी घ्यावी व्रतासारखी. वातीसारखी नको. संपत संपत जाणारी. तद्नंतर थांबणारी...
काळजी करण्यापेक्षा काळजी घेणारे हृदय होऊया. हृदयातून हृदयातली नाती जपुया. चला आपण सामर्थ्यवान होऊया.
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
mediabharatnews@gmail.com