नथुरामी प्रवृत्ती शंभर टक्के देशविरोधी असते !

नथुरामी प्रवृत्ती शंभर टक्के देशविरोधी असते !

नथुरामी प्रवृत्ती शंभर टक्के देशविरोधी असते !

नथुराम गोडसेचं कोणी समर्थन करणं यात कोणाला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. देशातल्या 100% लोकसंख्येने महात्मा गांधीजींचंच समर्थन केलं पाहिजे, असं जरुरी नाही. कोणी कोणाचा किंवा कुठल्या विचारांचा अनुनय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अट इतकीच आहे की विचारात एक सुस्पष्टता असावी.

नथुराम गोडसेचे समर्थक ज्या नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत, ते नरेंद्र मोदी विदेशात गेल्यावर कधीच हेडगेवार, गोळवळकर, सावरकर, गोडसे, उपाध्याय, मुखर्जी यांचा नामोल्लेखही करत नाहीत. इतकंच काय ते रास्वसंघाच्या संस्कारांबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त करत नाहीत की हिंदुंच्या हक्क/अधिकारांबाबत बोलत नाहीत. त्यांचं अस्तित्व गांधीजींचं नाव घेण्यावरच अवलंबून आहे.

नथुरामी प्रवृत्तींचा असा मोदींच्या प्रत्येक विदेश दौऱ्यात जागतिक पराभव होत असतो. पण ही मंडळी कोडगी आहेत. ते मोदींची चाटुकारिता सोडत नाहीत. कसलाही कणा नसलेले हे लोक मोदींचा जयजयकार करणं सोडत नाहीत.

नथुराम गोडसेचे समर्थक जर प्रामाणिक असते तर त्यांनी मोदींच्या या वृत्तीचा कडाडून विरोध केला असता, नरेंद्र मोदींचा धिक्कार केला असता. विदेशात हेडगेवार, सावरकरांचं नाव का घेत नाही, म्हणून त्यांना जाब विचारला असता.त्यांचे पुतळे जाळले असते. अगदीच नाही तर जगात जिथे तिथे गांधीजींचं समर्थन आणि गांधीजींचं उदात्तीकरण केल्यावरून त्यांनी नरेंद्र मोदींचा निवडणुकीत दारूण पराभव केला असता.

नथुराम गोडसेचं उघड समर्थन करणारे लोक हे बहुतांशी गांधीजींचा तिरस्कार करणारे आहेत. हे लोक बहुतांशी हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. त्यांना भारताचं हिंदुराष्ट्र व्हावं, असं वाटतं. ते गांधीजींच्या हत्येचा संबंध भारताच्या फाळणीची जोडतात आणि इथल्या लोकभावनेला हात घालून गांधी हत्येचं समर्थन करू पाहतात. हे लोक गांधीजींवर फाळणीपूर्वीही अनेकदा हल्ला झालेला असतो, ही गोष्ट सोयीस्कररीत्या लपवू पाहतात ; अर्थात यात आश्चर्यकारक असं काहीच नाही !

ही प्रवृत्ती कायम अशीच वागत आलेली आहे. सत्याचा विपर्यास करून असत्य सोयीस्करपणे लोकांच्या गळी उतरवण्याचं काम ही प्रवृत्ती या देशात शेकडो वर्षांपासून करत आलेली आहे. यात तितकंसा धक्कादायक असं काही नाही. यांची कृती कायम देशविरोधी राहिलेली आहे.

हे लोक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेचे वाहक असतात. आपल्याच देशातील गोरगरीबांची, मागासांची हेटाळणी करण्यात त्यांची कुचेष्टा करण्यात हे लोक विकृत आनंद घेत असतात. यांची व्यक्त होण्याची पद्धत साधारणतः कुजकट असते. विवेकवादाशी यांचा काडीमात्र संबंध नसतो. हे लोक अंधश्रद्धाळू, धर्मांध आणि कर्मकांडाचे समर्थक असतात.

दीडदमडीची लायकी नसतानाही गुणवत्तेपेक्षा इतरांना हिनवून स्वत:ला सिद्ध करण्यावर त्यांना अधिक विश्वास असतो. अपवाद वगळता नथुराम गोडसेचे समर्थक बहुतांशी विद्वेषी मनोवृत्तीचे असतात.

स्वतःला ही मंडळी राष्ट्रभक्त म्हणून घेत असतात; परंतु त्यांना राष्ट्राचं संविधान मान्य नसतं. त्यांना राष्ट्रगीत मान्य नसतं आणि त्यांना राष्ट्रध्वजही मान्य नसतो ; तरीही झुंडीच्या जोरावर ही मंडळी आपला सोयीस्कर राष्ट्रवाद पेरू पाहतात. हे सगळं लोकभावनेला हात घालून लोकांना अज्ञानात ठेवून त्यांची दिशाभूल करून होत असल्याने सर्वसामान्य माणूस त्याला सहज बळी पडतो.

आपण एखाद्या गोष्टीचं समर्थन किंवा विरोध का करत आहोत हे बहुतांशी लोकांना सखोल माहित नसतं. बहुमताच्या सोबत राहणं ही एक सर्वसामान्य वृत्ती आहे. नथुराम गोडसेचं समर्थन याच वृत्तीतून होत असतं. त्यामागे कुठलाही अभ्यास किंवा चिंतन नसतं.

मात्र ज्यांना आपली मतं अभ्यास, चिंतन आणि सचोटीच्या जोरावर बनवण्यावर आणि भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर विश्वास आहे, अशा भारतावर मनापासून प्रेम करणाऱ्या अस्सल भारतीयांनी संयमाने सत्य सांगत राहायची चिकाटी धरून ठेवली पाहिजे ! नथुराम आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या देशविरोधी प्रवृत्तीचं जिवंत मढं करण्याचा तो सर्वाधिक प्रभावी मार्ग आहे.

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!