की घेतले न हे व्रत अंधतेने !

की घेतले न हे व्रत अंधतेने !

की घेतले न हे व्रत अंधतेने !

सत्यशोधक मनोहर कदम प्रगतिक संशोधन केंद्राने यंदाचा सत्यशोधक चेतना पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांना घोषित झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रु.दहा हजार असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. दिवंतगत इतिहास संशोधक मनोहर कदम यांच्या स्म़तीदिनी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी मुंबईत परळ आर एम भट हायस्कुलात आयोजित स्मृतीजागर कार्यक्रमात पुरस्काराचं मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी व सचिव अंकुश कदम यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.


या निमित्ताने राज असरोंडकर यांचे जवळचे मित्र, अनेक आंदोलन, कार्यक्रम उपक्रमातील सहकारी, कायद्याने वागा लोकचळवळीच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षीदार व सहभागी सुदेश मालवणकर यांनी एका विशेषांकासाठी लिहिलेला लेख पुन:प्रकाशित करीत आहोत.


एकविसाव्या शतकातलं पाव शतक पूर्ण होत आलंय. एका शब्दात या कालखंडाचं वर्णन करायचंं झाल्यास 'अस्वस्थ' याशिवाय दुसरा समर्पक शब्द सापडत नाही. अशा काळाचं खास वैशिष्ट्य असतं ते म्हणजे या खदखदत्या अस्वस्थतेला कुकरच्या शिट्टीप्रमाणे वाट करून देणारी सामाजिक आंदोलनं.

गेल्या काही काळापासून आंदोलन म्हटलं की का कुणास ठाऊक पण आक्रस्ताळेपणा, आक्रमक व कधी कधी असभ्यपणाजवळ जाणार्‍या घोषणा, वैचारिक बैठकीचा,सामाजिक बांधिलकीचा संशय येण्याएवढा अभाव अशी काहीशी रचना प्रकर्षाने समोर येते. अर्थात नेहमी प्रमाणे येथेही अपवाद आहेतच पण नगण्य म्हणावे एवढेच.

अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर एकांड्या शिलेदाराप्रमाणे राज असरोंडकर या युवकाने सुरू केलेली कायद्याने वागा ही लोकचळवळ आपल्या नावापासूनच वेगळेपण जपून आहे.

"आमचा इझम भारतीय संविधान आहे. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक, धार्मिक, जातीय कट्टरतेला आमचा ठाम विरोध आहे. आपले म्हणणे शांतपणे, संविधानिक पद्धतीने मांडण्यावर आमचा विश्वास आहे. भारतीय संविधानांत नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो, त्याचवेळी भारतीय संविधानाने पुरस्कार केलेला विज्ञानवादाचा मार्ग आम्हाला प्राधान्याचा वाटतो. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुलभूत तत्वे आम्हाला प्राणप्रिय आहेत. आम्हाला या देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणायचं आहे."

असा स्पष्ट,स्वच्छ अजेंडा घेऊन मूळच्या पत्रकार असलेल्या राज असरोंडकर यांनी उल्हासनगर या शहरातील आपल्या राहत्या घरातून ही चळवळ कोणताही गाजावाजा न करता एकट्याने सुरू केली.

त्याचं कारण सांगताना ते म्हणतात "मी मुळचा पत्रकार ! पुढे राजकारणाच्या प्रांगणातही काही काळ घालवला. दोन्ही ठिकाणी काम करताना प्रश्नाचा सर्वांगीण ठाव घेणे त्यातल्या सत्यतेची खातरजमा करून घेणे  हे माझे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच मी केलेल्या बातमीचा पत्रकारितेतील अनेक सहकारी खात्रीशीर संदर्भ म्हणून निशंकपणे वापर करीत. या दोन्ही क्षेत्रात काम करताना हे जाणवले की, लोकांना असंख्य असुविधांना सामोरे जावे लागते आहे. त्यांना असंख्य प्रश्न पडतात. पण हे प्रश्न नेमके कुणाकडे व कशा स्वरूपात मांडले तर सुटतील याबाबत त्यांच्यात प्रचंड गोंधळ आहे. यावरून मग मी ठरवले की लोकांना संवैधानिक पद्धतीने या सगळ्यांबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. एक एक समस्या सोडवण्यापेक्षा समस्यांचे जे मूळ आहे, अव्यवस्था; तिलाच व्यवस्थित उत्तर द्यायला का शिकवू नये? यातूनच कायद्याने वागा लोकचळवळीचा जन्म झाला."

आंदोलनाची दिशा स्पष्ट असल्याने  हळू हळू समविचारी मंडळी जवळ येऊ लागली. काहींनी नेहमी प्रमाणे हसण्यावारी नेलं. "दोन दिवसांची नाटकं आहेत. आरंभशूर आहे तो , उतरेल ज्वर लवकरच." असं म्हणत अगदी जवळच्या वर्तुळातल्यांनीही थट्टेवारीच नेलं; पण म्हणतात ना  आंदोलनाना हवी असते योग्य दिशा. योग्य गती आणि शांतपणे मार्गक्रमण करण्याचं धाडस.

आंदोलनाची घटना म्हणजे जणू भारतीय संविधानाचं जागरण या उद्देशानं वाटचाल सुरू झाली.

या बाबतीत केलेल्या वाटचालीवर असरोंडकर म्हणतात,

"शिक्षण, आरोग्य, परिवहन हे विषय आमच्या सर्वाधिक प्राधान्यावर आहेत. या क्षेत्रात खाजगीकरण असू नये व कोणाही सर्वसामान्य नागरिकास परवडू शकेल अशी दर्जेदार अद्ययावत सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. केजी टू पीजी प्रत्येकाला संपूर्ण मोफत शिक्षण असलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. यासोबत नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः सक्षम व्हावं, त्यासाठी त्यांनी सरकार, प्रशासन नावाची व्यवस्था समजून घ्यावं, नियम कायदे समजून घेऊन त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरावा, सरकारांची कार्यपद्धती सहजसोपी, सुटसुटीत, पारदर्शी असावी यासाठी जनजागृती, पाठपुरावा, प्रसंगी आंदोलने अशी आमची धडपड सुरु आहे."

आंदोलन म्हटलं की सर्वप्रथम नजरेसमोर उभं राहणारं चित्र म्हणजे निदर्शनं,मोर्चे वगैरे . पण इथेच कायद्याने वागा चळवळीचं वेगळेपण दडलंय. संवैधानिक मार्गाने सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवताना त्यांनी मळलेल्या वाटा निवडल्या नाहीत.

आज सामान्यांच्या सामाजिक प्रश्नांना भावनिक प्रश्नांनी झाकोळून टाकलंय. दारासमोरून वाहणार्‍या नाल्याची तक्रार करण्यापेक्षा, कंबरडं मोडणार्‍या खड्डेमय रस्त्यांची तक्रार करण्यापेक्षा या सामान्य माणसाला ज्ञात अज्ञात चलाख धुरंदर नेत्यांनी गुंतवून ठेवलंय ते भावनिक लढ्यात. अशा वेळी "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंड करून ऊठेल!" या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राला अनुसरून असरोंडकरांनीही सुरूवात केली, पण वेगळ्या मार्गाने.

त्यांनी समाजातील संवेदनशील समजणार्‍या वर्गाला एकत्र करून एक व्हाट्सअप समूह निर्माण केला. कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशांच्या या समुहाने सुरवातीला कवितेच्या प्रातंत काही अभिनव प्रयोग करत या सार्‍यांना बोलतं केलं. परिसंवादातून, चर्चांतून अपेक्षित विषयांची बेमालूमपणे पेरणी केली.

आज झिम्माड असो उर्जासावित्री असो. अशा वेगवेगळ्या समाजमाध्यमावरील  समूहातून कधीही न व्यक्त होणारी माणसं हिरीरीने बोलू लागलीत. चर्चा करू लागलीत. अशा प्रयोगातूनच, ज्याला व्यावसायिक जगतात टार्गेटेड ऑडिअन्स म्हणतात तो कायद्याने वागाशी जोडला जाऊ लागला.

आता पुढचे पाऊल होते ते या योग्य अशा मनुष्यबळाला  प्रशिक्षित करणे. त्यासाठी निवासी शिबीरं घेणं सुरू केलं. त्यातही उपदेशाचे डोस पाजण्याचा कार्यक्रम असं स्वरूप येऊ नये म्हणून या शिबीरांना निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक अशा स्वरूपात बदललं.

अनेक तरूण,तरूणी ज्यांनी  अभ्यासक्रम म्हणून समाजसेवा(MSW) हे क्षेत्र निवडले होते अशा गटांसोबत समूहचर्चा अशा स्वरूपात विचारांची देवाण घेवाण करत कधी, हलक्याफुलक्या पद्धतीने चित्रपटगीताचा संदर्भ देत आपली विचार व आचार प्रणाली बिंबवली. समाजसेवेतली पदवी घेतलेल्या या तरूणांतील अनेकांमध्ये या नोकरीत जाॅब सॅटिस्फेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारीचा सूर जाणवला.

त्यावर मार्गदर्शन करताना असरोंडकरांनी त्यांना याची जाणीव करून दिली की तुम्ही करता ते कार्य जरी समाजसेवेचे असले तरी ती समाजसेवा नसून नोकरी आहे. ती मोबदला घेऊन केलेली सेवा आहे, असे तत्वत: म्हणता येत नाही. जर या सेवेतून मिळणार्‍या मोबदल्यातला काही अंश तुम्ही समाजसेवेसाठी खर्च केलात तर ती खर्‍या अर्थाने समाजसेवा असेल व त्यातून तुम्हाला समाधान मिळू शकेल. अशा  दृष्टीने आपल्या कामाकडे पाहा. हा दृष्टीकोन या युवकांसाठी नवीनच होता. ते प्रभावीत झाले व त्यातूनच राकेश पद्माकर मीना याच्यासारखा उच्चशिक्षीत व समाजसेवा व्रत म्हणून घेणारा युवक कायद्याने वागाला राज्य समन्वयक म्हणून लाभला.

आज त्याच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक जिल्ह्यात कायद्याने वागा लोकचळवळ पोहोचली. ही सगळी मंडळी अनेकविध एन.जी.ओ. मधून कार्यरत असल्याने अप्रत्यक्षपणे कायद्याने वागाच्या विचारांची प्रचारक ठरताहेत.

दुसर्‍या बाजूला उर्जासावित्री या समाजमाध्यमावरील समूहामार्फत एक क्रांतीकारी उपक्रम अनेक शहरात राबविला जातोय. त्याचा उल्लेख इथे आवर्जून करायलाच हवा.

महिलांचा समूह म्हटला म्हणजे सुरवातीला त्यांना भेडसावणार्‍या अनेकविध प्रश्नांवर चर्चा असे स्वरूप होते. त्यात भाग घेणार्‍या सदस्यांचे प्रमाण विषयानुसार कमीअधिक प्रमाणात असायचे. पुढे त्यांच्यासाठी असलेल्या अनेक कायद्यांचे, कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन विषय व त्याचे गांभीर्य समजावण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातून एक बाब समोर आली की सामान्य महिला तर संकोचाने व्यक्त होतातच पण ज्या महिला अनेक वर्ष राजकारणात , समाजकारणात सक्रीय आहेत त्याही सगळ्याच प्रश्नांवर आपली बाजू भक्कमपणे, मुद्देसुदपणे मांडू शकत नाहीत. यातून जन्म झाला महिला लोक प्रतिनिधींच्या प्रशिक्षण शिबीरांचा.

अशा शिबीरांमधून या महिला लोकप्रतिनिधींना याची जाणीव करून दिली जाते की,

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ पैकी केवळ २४ स्त्री आमदार आहेत आणि गेल्या ६२ वर्षातील हा आजवरचा उच्चांक आहे, याची खंत स्त्रीयांना वाटतेय, असं चित्र नाही. स्त्री कार्यकर्त्या पक्षात मिळणाऱ्या फुटकळ पदांवर, तथाकथित मोठेपणावर खूश आहेत. पक्षात म्हटलं तर काहीच अस्तित्व नाही, म्हणणं कोणी ऐकून घेत नाही, पुरेसा मानसन्मान नाही, पक्ष स्त्रीयांचे प्रश्न उचलत नाही, त्या प्रश्नांवर पक्षात चर्चा होत नाही, पक्षांचे नेते स्त्रीयांच्या प्रश्नांवर कधी कुठल्या सभांमध्ये बोलत नाही, पक्षाची ध्येयधोरणे ठरवताना कोणी विचारत नाही, निर्णयाधिकार नाहीत...तरीही स्त्री कार्यकर्त्या विविध राजकीय पक्षांमध्ये आनंदाने मिरवताना दिसतात. नेत्यांच्या पंचारती ओवाळणं हेच त्यांना थोर कार्य वाटतं.

महाराष्ट्रात आज अनेक स्त्री नेत्या विविध रिकामटेकड्या विषयावर वादग्रस्त मतप्रदर्शन करताना दिसतात, तावातावाने बोलताना, आव्हाने-प्रतिआव्हाने देताना दिसतात ; पण आजही राज्यात स्त्रीयांसाठी मुतारीची व्यवस्था मोफत नाही, या इतक्या साध्या व महत्त्वाच्या समस्येचं त्यांना काही सोयरसुतक नाही. इतर विषय तर लांबच राहिले !

स्त्रीयांचे बहुतांशी प्रश्न पुरुषसत्ताक व्यवस्थेचा परिणाम म्हणून निर्माण झालेले आहेत. त्या व्यवस्थेला आव्हान दिल्याशिवाय त्या प्रश्नांचं मूळासकट निवारण अशक्य आहे. पण तीच पुरुषसत्ताक व्यवस्था जोपासण्यासाठी स्त्री कार्यकर्त्या राबताना दिसतात. या कडे लक्ष वेधून या कार्यरत लोकप्रतिनिधी महिलांना त्यांच्या त्यांच्या पक्षात,संघटनेत या विषयांवर आवाज उठवायला लावला.त्याचे सकारात्मक परिणाम जवळच्या भविष्य काळात निश्चितच बघायला मिळतील अशी खात्री नव्हे तर ठाम विश्वास असरोंडकरांच्या बोलण्यातून जाणवतो.

ते म्हणतात की,"हा लढा म्हणजे संविधानिक विचारांचा नागरिक घडवण्याचं पहिलं पाऊल आहे. शेवटी आपण लोकशाही देशात राहातो म्हणजे प्रत्येक प्रश्न हा बहुमतावरच सोडवला जातो.असे असताना संविधानिक मार्गाने चालणार्‍या नागरिकांचं बहुमत वाढवणे ही काळाची गरज आहे ; पण कोणतीच संघटना या विषयावर काम करताना दिसत नाही.आणि म्हणूनच कायद्याने वागा चळवळीने या मुद्यालाच प्राधान्य देण्याचे ठरवलेय.

कोणतीही सामाजिक लढाई लढायची असेल तर आंबेडकरांना अपेक्षित संविधानिक मार्गाच्या माध्यमातूनच यशस्वी होऊ शकते. हे सांगताना त्यांनी आंबेडकरांच्या एकंदर सामाजिक लढ्यांतून एक त्रीसूत्री मिळवल्याचंही ते आवर्जून सांगतात.

आंबेडकरांची त्रिसूत्री म्हणजे
१) विषयाची तळमळ
२) विषयाचा सर्वांगीण अभ्यास
३) विषयाची योग्य मांडणी

आजपर्यंत कायद्याने वागा लोकचळवळीने नागरिकांचे वैयक्तिक असो की सामाजिक सर्वच प्रश्न याच त्रिसूत्रीच्या माध्यमातून सोडवल्याचे असरोंडकर अभिमानाने सांगतात.

"कायद्याने वागाकडे तक्रार घेऊन येणार्‍या तक्रारदाराला आम्ही आधी ही स्पष्ट जाणीव करून देतो की त्यांचे प्रश्न हे कायद्याने वागा सोडवणार नसून ते नक्की कसे सुटतील याचं योग्य व शेवटपर्यंत मार्गदर्शन संघटना करेल. पण हा मार्ग संवैधानिक असल्याने तो राजकीय नेत्यांप्रमाणे झटपट किंवा खळ्ळखट्याक मार्गाने सुटतो तसा सुटणार नाही. कारण आपल्यावर अन्याय झाला असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा तो अन्याय करणारा निश्चितच असंवैधानिक वागलेला असतो. अशा अधिकार्‍यांशी, बिल्डरशी, नेत्याशी आपल्याला संविधानाच्या मार्गाने लढायचे आहे. त्यामुळे या लढ्यात आपणांस साधे खरचटणारही नाही आणि चमत्कारिकपणे अशा व्यक्ती माघार घेतील हे शक्य नाही. त्यामुळे सातत्याने व योग्य व्यक्ती किंवा व्यवस्थेकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याची जाणीव करून दिल्यावर काही जण कचरतात पण जे नेटाने प्रकरण लावून धरतात अशांना खात्रीने न्याय मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

की घेतले न हे व्रत अंधतेने !

याची पूर्णत: जाणीव असल्याने ही लोकचळवळ जोपर्यंत शेवटचा नागरिक हा संविधानाच्या मार्गाने जात नाही, आपल्या दैनंदिन जीवनात संविधानिक आचार पद्धती स्वीकारत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे, याची मला पूर्ण व स्पष्ट कल्पना आहे. त्यामुळे  माझी यशाची व्याख्या ही सरधोपट समाजमान्य व्याख्येपेक्षा वेगळी आहे. ह्या चळवळीला कदाचित माझ्या हयातीत तसे यश येणार नाही पण किमान ह्या अंधार्‍या अस्वस्थतेच्या काळात आपण संविधान मानणार्‍या, आचरणार्‍या व त्यांचे बहुमत असणार्‍या लोकचळवळीचे कारण झालो, यातच माझ्या जीवनाचे सार्थक झाले, असे मी समजेन.

हे वक्तव्य करताना राज असरोंडकरांच्या मनातल्या दुष्यंत कुमारांच्या ओळी आपल्याला सहज ऐकू येतात.

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

ही संविधानाच्या चळवळीची आग प्रत्येक भारतीयाच्या मनात ज्योत म्हणून तेवत राहील, तो सुदिन ही चळवळ कधीतरी निश्चित पाहीलच; कदाचित आपण त्यावेळी असू किंवा नसू .

त्याने काय फरक पडणार आहे?

 

 

सुदेश मालवणकर

सामाजिक-राजकीय अभ्यासक | साहित्यिक | कार्यकर्ता

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!