कृषि विकास प्रतिष्ठानचा यंदाचा सोमेश्वर पुसतकर स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरुणा सबाने यांना घोषित झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिदिनी बुधवार २ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं. ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व अर्थशास्त्रज्ञ पद्मश्री मा. डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते व सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मा. डॉ. शोभा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार दिला जाणार आहे. कृषि विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.

अरुणा सबाने या त्यांच्या शालेय जीवनापासून महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात अभ्यास करून त्यांच्या समस्या समजून घेऊन सतत कार्यरत राहिल्या आहेत. त्या स्वतः उत्तम लेखिका, वक्त्या व उत्तम कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. आकांक्षा मासिक त्या गेली २५ वर्षे चालवित आहेत. महाराष्ट्रात प्रमुख स्त्री कार्यकर्त्या म्हणून त्यांची गणना होते.
एखादे शहर सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध करायचे असेल तर त्या गावामध्ये या संदर्भात होत असलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून होत असते. हे सर्व करण्यासाठी अशा शहरांमध्ये एखादा केवळ उत्साहीच नव्हे तर या सर्व क्षेत्रांतील उपजत माहिती असणारा सर्वसमावेशक असा संघटक हवा असतो. अमरावती शहरात एकोपा ठेवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता आणि जे कृषि विकास प्रतिष्ठानचे देखील उपाध्यक्ष होते, ते दिवंगत सोमेश्वर पुसतकर ! त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थं पुरस्कार दिला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या समारंभास उपस्थित राहण्याचं आवाहन श्रीराम काळे, प्रा. अरुण वानखडे, किशोर कन्हेरे, बंडोपंत उमरकर, राजेश गांधी, किशोर कडू, निलेश खांडेकर, ॲड. निशांत गांधी, नरेश अरसडे, श्रीधर सोलव, अतुल चरपे व मित्र परिवाराने केलं आहे.