२५ नोव्हेंबर २०२१ ! संजयला सह्याद्री प्रतिष्ठान विशेष पुरस्कार मिळाला तो दिवस...शाळा करून घाई घाई ने आम्ही पुण्याला जायला निघालो. उशीर झाला होता..आजही आठवतंय मला .. खूप सुंदर होता तो क्षण...
उशीर झाला होता ; तरीही तिथे गेल्यावर छान स्वागत झालं आमचं. महत्वाच्या व्यक्तिंच्या पहिल्या रांगेत आम्ही बसलेलो... वर स्टेजवर सर्व मान्यवर... संभाजी मालिकेतील काही कलाकार स्टेजवर मान्यवर म्हणूनही होते.

त्यातील पल्लवी वैद्य एक.. ती आणि मी, आम्ही अगदी समोरासमोर होतो.. तिला मी एक छानशी स्माईल दिली. त्यानंतर तिनेही माझ्याकडे नजरेला नजर भिडवून सुंदर स्माईल दिली.. आम्ही दोघीही गालातल्या गालात बराच वेळ हसत राहिलो..
माझ्या मनात विचार आला. अरे ! ही नक्की आपल्यालाच स्माईल देते आहे ना की आणखीन कोणाला ? म्हणून सहजच आजूबाजूला नजर फिरवली तर सगळ्यांचेच चेहरे उजळलेले... मला कळेचना ?

पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी मी माझा डावा हात हलकेच वर उचलून तिला 'हाय' केलं.. तिनेही हसून हात वर करून मला हाय केलं.
मी पुन्हा संभ्रमात.. आता तरी हे माझ्यासाठीच होतं ना ? म्हणून पुन्हा एकदा आजुबाजुला पाहिलं.. अरेच्चा आताही बऱ्याचजणांचे हात वर....
नंतर मात्र बराच वेळ ही स्मितहास्याची जुगलबंदी चालूच राहिली.. तिचं मला माहीत नाही , पण मी तर एकदम फिदा झाले तिच्यावर... कार्यक्रम संपल्यावर हिला भेटून तिच्या बरोबर एकतरी फोटो काढायचा असं ठरवलं .
पण छे... ती कार्यक्रम संपायच्या थोडी आधीच निघून गेली... आणि हे स्वप्नच राहिलं... पण तो क्षण , नजरेला भिडणारी नजर आणि स्मितहास्याची ती जुगलबंदी कायम लक्षात राहील अशीच होती..

आयुष्याचंही असंच काहीसं असतं ना.... शेवटपर्यंत कळतच नाही.. हे आपल्यासाठी आहे की नाही ? यातच आपला बराच काळ निघून जातो आणि आनंद घ्यायचाच राहून जातो.
कोणता क्षण आनंद देऊन जाईल हे सांगता येत नाही; पण तरीही त्या एवढ्याशा क्षणात खूप छान जगून घेता येतं... सुंदर आठवणी जपून ठेवता येतात...पुन्हा कधीही त्या आठवल्या तरीही संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर येतो आणि पुन्हा एकदा आनंदलहरी मनात तरळून जातात..!!
नंदा गवांदे
लेखिका शिक्षिका आहेत.
gawandenanda734@gmail.com
सौ उज्वला राजेंद्र डूंबरे
खूपच छान लेख