थायलँडमध्ये माजी उपप्रधानमंत्र्याच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
भारतातील शैक्षणिक धोरणांबद्दलची निर्णयाक मत मांडणी आणि आपल्या शैक्षणिक संस्थेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनातून गाठलेला संस्थेचा उत्कर्ष याची दखल घेत अंबरनाथच्या शिफा ग्रुप ट्युशन्सच्या संचालिका यास्मिन नजिम शेख यांना थायलंडमध्ये एका समारंभात पुरस्कृत करण्यात आले. यामुळे अंबरनाथ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. यासाठी यास्मिन शेख यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ब्लाइंड वाईंंड या सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून यास्मिन शेख यांच्या शैक्षणिक संस्थेच्या सुव्यवस्थापनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. इंटरनॅशनल अॅचिव्हर्स कॉन्फरन्स या संस्थेने देशभरातील २९ राज्यातून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ७५ समाज धुरिणांचा हा विशेष पुरस्कार देऊन विशेष गौरव केला.

यात शैक्षणिक क्षेत्रात अद्ययावत कार्याबद्दल यास्मिन शेख यांची निवड झाली होती. बँकॉकच्या थायलंड येथील हॉलिडे इन या सभागृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात संस्थेच्या वतीने आयोजित १५ व्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात यास्मिन शेख यांना बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२२ चे नेतृत्व म्हणून हा पुरस्कार बहाल केला गेला.
ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी व आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेतून हा पुरस्कार मानाचा मानला जातो. याप्रसंगी, थायलँडचे माजी उप प्रधानमंत्री एच.ई. ख़ूनकोर्न, राज्य सभेचे माजी सदस्य के सी त्यागी उनियाल, बाॅलिवुड अभिनेता विवेक ओबेरॉय आदी उपस्थित होते. यास्मिन यांना याआधीही जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अंबरनाथ शहराचे नाव अभिमानाने उच्चारले जाते, याचा आनंद अवर्णनीय आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अद्ययावत तंत्रशुद्ध मात्र परवडणारे शिक्षण पोहचवणारी शैक्षणिक धोरणं वाढीस लागावीत अशी अपेक्षा असल्याचे मत यास्मिन शेख यांनी व्यक्त केले.
अशा समारंभांंच्या माध्यमातून परदेशी हितसंबंध सुदृढ होण्यासही वाव मिळतो. त्यामुळे या पुरस्काराचा मला निश्चितच अभिमान वाटतो. याचे श्रेय माझे सर्व विद्यार्थी आणि सहसंचालक नजीम शेख यांनाच देईन, अशी प्रतिक्रिया यास्मिन शेख यांनी व्यक्त केलीय.
प्रफुल केदारे
सहसंपादक, मीडिया भारत न्यूज
kedarepraful@gmail.com