भाजपाचं काम बऱ्यापैकी फत्ते झालंय !!

भाजपाचं काम बऱ्यापैकी फत्ते झालंय !!

भाजपाचं काम बऱ्यापैकी फत्ते झालंय !!

भारतीय जनता पार्टी ही भारतीय राजकारणातील सर्वात मोठी राजकीय शक्ती असल्याचं मानलं जातं. तिथे नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. ही मंडळी तथाकथित चाणक्य आहेत, हुशार आहेत, डावपेचात वाकबगार आहेत, असा गैरसमज आणि ते जे काही करतात ते फार मनापासून असतं, प्रामाणिक असतं आणि हिंदुधर्मरक्षणासाठी त्यांनी आयुष्य वाहिलेलं असल्याने ते अत्यंत विश्वासार्ह असतं, त्यात कोणतंही कपटकारस्थान असूच शकत नाही, हा भाबडेपणा ज्यांच्याकडे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या सापळ्यात सापडतात. जसे आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं झालंय.

एकनाथ शिंदे आधी भारतीय जनता पार्टीच्या छळवादाने त्रासलेले होते. भाजपासोबत युतीचं सरकार असताना मिळणाऱ्या अपमानजनक वागणुकीने व्यथित आणि सोबत संतप्त होऊन त्यांनी भर सभेत मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला होता.

पुढे राजकारण बदललं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं सरकार बनलं. एकनाथ शिंदे तिथेही मंत्री झाले. अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदेंना वाटू लागलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत सरकारात असणं चुकीचं आहे. आपली राजकीय विचारसरणी हिंदुत्ववादी आहे आणि आपण भाजपासोबत सत्ता स्थापन केली पाहिजे. असं वाटण्यात शिंदेंचं काही चुकलं असं समजण्याचं कारण नाही.

शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदुत्वाच्या एकाच मुद्यावर शिवसेना सोडून भाजपासोबत जाता आलं असतं. हिंदुत्वासाठी वाट्टेल तो त्याग करायला तयार असलेल्यांनी सरळ शिवसेना सोडून भाजपासोबत सत्तेत जाणं जास्त सोपं होतं.

शिंदेंसोबत पक्षफूटीसाठी लागणारं पुरेसं संख्याबळ होतं. आमच्या मूळ राजकीय पक्षात फूट पडली आहे आणि आम्ही वेगळा गट स्थापन केला आहे, असं आमदारांच्या सहीचं लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना गेलं असतं तर आवश्यक संख्याबळ तपासून विधानसभा अध्यक्षांना त्या गटाला मान्यता देणं कायदेशीररीत्या भाग पडलं असतं. या गटाला धर्मवीर सेना वगैरे काही नाव देता आलं असतं.

हा गट बनल्यावर संबंधित आमदार महाविकास आघाडी या नकोशा त्रांगड्यातून बाहेर पडू शकले असते. त्यांच्या हातात सत्तेच्या नाड्या आल्या असत्या. ते भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करू शकले असते. ईडीची झंझटही संपली असती !

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला दुय्यम खाती आली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मंत्र्यांकडून दुजाभाव झाला, निधीबाबत भेदभाव झाला, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मधल्या लोकांनी पक्षप्रमुख वजा मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणी पोहचवली नाहीत, अशाही तक्रारी आहेत. पण हिंदुत्वाच्या मुद्यापेक्षा त्या गौण आहेत, असं एकंदरीत फुटीर आमदार आणि त्यांच्या समर्थकांच्या वक्तव्यावरून दिसतं.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वापासून शिवसेना दूर गेलीय, ही फुटीरांची 'खंत' आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी नवा गट /पक्ष स्थापन केला असता तर देशाला भाजपासोबत आणि महाराष्ट्रात मनसेसोबत आणखी एक हिंदुत्ववादी पक्ष मिळाला असता. सगळे हिंदुत्ववादी शिवसैनिक नव्या पक्षाकडे आले असते. ( ते आजवर जगातला एकमेव हिंदुत्ववादी पक्ष भाजपाकडे का गेले नाहीत, हे मोठं कोडंच आहे.‌ बरं शिवसेना महाविकास आघाडीत शिरली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेबाहेर का नाही पडले, हे त्याहून मोठं कोडं आहे. )

असो. नवा हिंदुत्ववादी गट / पक्ष स्थापन केला असता तर हिंदुत्ववादाच्या जोरावर आणि भाजपा व कदाचित मनसेच्या पाठबळावर सर्वच्या सर्व एकनाथी फुटीर आमदार पुढची काही वर्षे पुन्हा पुन्हा विधानसभेत निवडून येऊ शकले असते. बाळासाहेब ठाकरेंचं नाव / फोटो मनसेही वापरतेच आहे. जोडीला आनंद दिघेंचं नाव घ्यायला संकल्पित धर्मवीर सेनेला काहीच अडचण नव्हती.

अगदी सरळसोप्पं हिंदुत्ववादी राजकारण होतं. पण ते गुजरातच्या मार्गाने गुवाहाटीपर्यंत भरकटलं. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्याचं उद्दिष्ट साध्य करणं आणि त्यालाच प्राधान्य देण्याऐवजी एकनाथी बंड उद्धव ठाकरेंनाच शिवसेनेतून बाहेर काढून तो पक्षच ताब्यात घेण्याची धडपड करताना दिसू लागलं. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असं फुटीर गटाने नाव घेणं दिसतं तितकं सरळ नाही.

एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वारसदारांनाच राजकारणातून पार नेस्तनाबूत करायचं अशा हालचाली सुरू असल्याचा डाव समोर आला. भाजपाने आपले सतावणुकीचे फासे संजय राऊतांपर्यंत नेले ; ठाकरे कुटुंबियांच्या गणगोतापर्यंतही नेले ; पण उद्धव ठाकरेंना थेट हात लावण्याची भाजपाची हिंमत झाली नाही. कारण एकच ! सोबत असलेलं शिवसेनेचं भरभक्कम पाठबळ ! त्यालाच सुरुंग लावण्याचं भाजपाई सूडबुद्धीचं कटकारस्थान फुटीर आमदारांच्या तथाकथित बंडाआडून सुरू आहे.

तथाकथित बंड यासाठी की मूळात हे बंडच नाही. हे सगळे फुटीर आमदार भाजपाच्या सापळ्यात अडकलेले सावज आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्या पाठोपाठ आपला क्रमांक कधीही लागू शकतो आणि इतक्या वर्षात कमावलेलं कधीही मातीमोल होऊ शकतं या भयाने पछाडलेले हे लोक आहेत.

उद्धव ठाकरेंचं छायाचित्र वगळून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ कोणकोणत्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज लावली याचं नीट निरीक्षण केलं तर आढळेल की अल्पावधीत करोडपती झालेली मंडळी त्यात बहुतांशाने आहेत.

ज्यांना हिंदुत्व हा शब्दही नीट उच्चारता येत नाही, असे नवहिंदुत्ववादी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ गल्लोगल्लीत निर्माण झाले आहेत. शिवसेनेत आणि शिवसेनेच्या बाहेर हिंदुधर्मीयांत उद्धव ठाकरेंच्या विरोधात लाट निर्माण करण्याची सगळी धडपड सुरू आहे. समाजमाध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी पसरवून शिवसैनिकांना संभ्रमित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातून शिवसेनेत उभी आडवी फूट पाडून शिवसेना पक्षच संपवण्याचं सूडाचं राजकारण भाजपा खेळते आहे. पण झाडाआडून !

ही शक्यता नाकारता येत नाही की कदाचित सगळ्याच आमदारांना शिवसेनाविरोधी षडयंत्राची कल्पना नसेलही. त्यांना इतकंच सांगण्यात आलं असेल की आपल्याला फक्त भाजपासोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणायचाय. जितके जास्त आमदार दिसतील तितकं साहेबांना निर्णय घेणं अपरिहार्य होईल.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, असं जे फुटीर आमदार बोलत होते, ते यामुळेच असेल की शिवसेना संपवायचे डावपेच तोवर त्यांच्यासमोर आले नसतील. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती चिघळत हाताबाहेर जाताना ते हतबल होऊन पाहत बसले असतील. असे खरंच कोणी आमदार असतील तर महाराष्ट्रात परतल्यावर ते एकनाथ शिंदे सोबत नसतील !

गुजरातमार्गे गुवाहाटीत पोहचलेले काही आमदार उद्धव ठाकरेंनीच 'पेरलेले' असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसं असेल तर एकनाथ शिंदेंचं बंड आकड्यांच्या बाबतीत फसल्यात जमा होईल आणि तसं होण्याचीच शक्यता अधिक आहे.

गुजरात, आसाम या भाजपाशासित राज्यांची पलायनासाठी, लपण्यासाठी निवड, भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सोशल मीडियात या बंडासाठी सहानुभूतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपा समर्थकांचा सहभाग यातून सगळा खेळ भाजपाच पडद्याआडून खेळतेय हे स्पष्ट आहे, पण भाजपा महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेली नाही हेसुद्धा एकनाथ शिंदेचं बंड फसेल या शक्यतेचे संकेत आहेत, किंबहुना भाजपाला हा डाव तडीला न्यायचाच नाहिये.

महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करणं, शिवसेनेत गोंधळ माजवणं, शिवसैनिकांत संभ्रम निर्माण करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, शरद पवारांची 'खलनायक' म्हणून भूमिका रंगवणं, संजय राऊतांविरोधात शिवसैनिकांत असंतोष निर्माण करणं आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंना शिवसेनेत एकटं पाडणं, हिंदुत्वविरोधी ठरवून राजकीयदृष्ट्या हतबल अवस्थेत आणणं, शिवसेनेपासून 'ठाकरे' आडनाव तोडणं, शिवसेनेची शकलं करणं, शिवसेनेला महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या प्रभावहीन करणं अशा अनेक खेळ्या भाजपाने एकाच चेंडूत यशस्वी केल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय.

एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता मिळाली काय नि नाही मिळाली काय, फुटीर आमदार निलंबित झाले काय नि नाही झाले काय, ते आमदार शिवसेनेत राहिले काय नि नाही राहिले काय, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला काय नि नाही दिला काय, सत्ता आली काय नि नाही आली काय, नामानिराळं राहून भाजपाचं काम बऱ्यापैकी फत्ते झालंय आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि इतरांची भाजपासाठी गरज संपलीय. चौकश्यांच्या आणि एका रात्रीत रस्त्यावर येण्याच्या भीतीने भाजपाने आपली फसवणूक केल्याबद्दल नाराज किंवा संतप्त होण्याचा पर्यायही या आमदारांकडे नाही.

महाराष्ट्रात फुटीर आमदार परतल्यावर शिवसैनिकांनी त्यांचा 'बंदोबस्त' नाही केला, तर शिवसेना संपल्याचं चित्र समोर येईल आणि शिवसैनिकांनी महाराष्ट्रभर आपला 'हिसका' दाखवला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मार्ग सुकर होईल. इथेही दोन्ही बाजूंनी कोणीतरी भलतंच 'शिवसैनिकांची' भूमिका निभावेल, ही शक्यताही उरतेच ! गंदा है पर धंदा है...असा एक वाक्प्रचार आपल्याकडे वापरला जातो. सगळं दिसतंय, समजतंय...पण खटकत नाहीये ! गंभीर हे आहे की आता लोक अराजकतेलाच हिंदुत्व समजू लागले आहेत !!

 

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!