आव्हाडांना जेव्हा पप्पू कालानीत ‘लोकशाही’ दिसते !

आव्हाडांना जेव्हा पप्पू कालानीत ‘लोकशाही’ दिसते !

आव्हाडांना जेव्हा पप्पू कालानीत ‘लोकशाही’ दिसते !

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्ष पंचम कालानी यांनी शरद पवारांच्या 'आत एक, बाहेर एक' राजकारणाची चांगलीच पोलखोल केलीय. २०१७ ला जो आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता, तो पक्षाला विचारूनच केला होता, असा गौप्यस्फोट पंचम कालानी यांनी केलाय. त्यामुळे भाजपाशी आतून सलगी असल्याचा आरोप असलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी अधिकच अडचणीत आली आहे.

उल्हासनगरातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जेव्हा पंचम कालानी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा भाजपाप्रेमाचा बुरखा फाडला तेव्हा राष्ट्रवादीचे एक बडे नेता जितेंद्र आव्हाड मंचावर होते. कालानीच्या वक्तव्याची बक्षीसी म्हणून आव्हाडांनी, यापुढच्या सगळ्या निवडणुका पप्पू कालानीचा फोटो लावून लढल्या जातील आणि पप्पू कालानी हाच राष्ट्रवादीचा चेहरा असतील, असं घोषित केलं. तत्पूर्वी भाजपावर प्रहार करताना आव्हाडांनी आपण गांधीनेहरूंचा अनुयायी असल्याचं वक्तव्य केलं होतं मग भाषणात पुढे पप्पू कालानीपुढे लोटांगण घातलं.

२०१७ ला ऐन महापालिका निवडणुकीत पप्पू कालानी समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पाठीत सुरा भोसकत भाजपाची वाट धरली होती. महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन पंचम कालानी यांनी महापौरपदही उपभोगलं. २०१९ ला महाराष्ट्रात मविआची सत्ता आल्यावर कालानीला पुन्हा राष्ट्रवादीचे वेध लागले. दरम्यानच्या आकस्मिक संकटकाळात राष्ट्रवादीची धुरा वाहणाऱ्या भारत राजवानी आणि सोनिया धामींकडून शरद पवारांनी अचानक सूत्रं काढून घेतली आणि पक्ष पुन्हा पप्पू कालानीला आंदण दिला.

पक्षावर पुन्हा कब्जा आल्यावर पप्पू कालानीने पहिलं काम काही सुरू केलं तर भारत राजवानी आणि सोनिया धामींचे पंख छाटणे ! पण दोघेही कालानीला पुरून उरले. आता पप्पू कालानीच्या पाठीशी उभे राहिलेत जितेंद्र आव्हाड !

आव्हाडांना पप्पू कालानीत लोकशाही दिसते. पुरोगामित्व दिसतं. धर्मनिरपेक्षता दिसते. भारतीय संविधान दिसतं. म्हणूनच कदाचित उल्हासनगरातील पुढच्या निवडणुकांत पप्पू कालानी राष्ट्रवादीचा चेहरा असेल असं आव्हाडांनी घोषित केलं. ही घोषणा करण्यापूर्वी आव्हाडांनी पप्पू कालानीचा आधी पक्षप्रवेश तरी घडवून आणणं आणि महत्वाचं म्हणजे घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणं गरजेचं होतं.

एका निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे म्हणाले होते की बरं झालं भाजपाशी युती झाली नाही, नाहीतर पप्पू कालानीसोबत माझा फोटो लागला असता ! आता आव्हाडांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यु टर्न घेतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आव्हाडांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला तो परिसर भारत राजवानी यांचं राजकीय कार्यक्षेत्र आहे. मेळाव्यात राजवानी यांना डावलण्यात आलं. नुसतं डावललं नाही तर पप्पू कालानीची खूशमस्करी करण्याच्या नादात आव्हाडांनी सिंधी समाजाबद्दलही अपशब्द काढले. एक शेर को मारने के लिये सौ सिंधी कुत्ते भी कुछ नहीं कर सके, या वक्तव्यावरून भारत राजवानी यांनी 'आव्हाडांनी सिंधी समाजाची माफी मागावी' असा पवित्रा घेतल्यावर आव्हाडांनाही 'सिंधी समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता' असा बचाव करावा लागलाय.

राजकारण किती सत्तास्वार्थी आणि संवेदनाशून्य असतं याचंच हे बोलकं उदाहरण ! कालानीने पक्षाशी गद्दारी केल्यावर ज्यांनी संकटकाळात पक्ष सावरला, सांभाळला, चालवला, त्यांनाच संपवायला आव्हाडांसारखा तथाकथित पुरोगामी नेता गद्दारांना पाठबळ देत मैदानात उतरला होता. गंमत म्हणजे त्याच मंचावरून आव्हाडांनी शिंदे गटाच्या लोकांना गद्दार म्हणत त्यांना राजकारणातून संपवण्याचं आवाहन लोकांना केलं.

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!