दीपावली या शब्दात दीप आहे. दिवाळी या शब्दात दिवा आहे. हा सण दिव्यांशी संबंधित आहे, हे कोणी लहान मूलही सांगेल. पण हे दिवे सर्वप्रथम कोणी का लावले? उत्सव जर दिव्यांशी संबंधित असेल तर ही फटाक्यांची ब्याद कुठून आले? फटाके आणि दिवाळी यांचा नेमका संबंध काय? दिव्यांपुरती दिवाळी मर्यादित ठेवली तर काय होईल? धर्म बुडेल की तरेल?
कोणाला काहीही माहित नसतं, पण जर कोणी सणासुदींना धर्माच्या नावावर चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध केला की अर्धवटरावांच्या नाकपुड्या फुगतात.

दिवाळीला पुराणंही आहेत आणि इतिहासही आहे. रावणाला हरवून राम अयोध्येला परतला तेव्हा जनतेने दिव्यांची आरास करून तो दिवस साजरा केला होता, अशी श्रद्धा आहे. सम्राट अशोक यांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला, असाही दावा आहे.
सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली, असाही एक संदर्भ दिला जातो.
भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावांनी आले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्रीनामक उत्सव म्हणजे दीपालिका उत्सव होय.
श्रीहर्षाच्या नागानंद नाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजे दीपावालीचाच उत्सव आहे. नीलमतपुराणात यालाच दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे.
ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र या ग्रंथांतही दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो. तुकारामांच्या अभंगातही दिवाळीचा उल्लेख आलाय. त्यामुळे दिवाळी सणाच्या अस्तित्वाबद्दल कोणी काही शंका घेण्याचं कारण नाही.

दिव्याचा शोध अश्मयुगात इ.स.पू. ७० हजार वर्षांपूर्वी लागला असल्याचं सांगितलं जातं. हा दिवा दगडात खोदलेला असायचा. खोलगट केलेल्या भागात प्राणिजन्य चरबी आणि शेवाळे द्यालून वा तत्सम भिजणारा पदार्थ त्यात द्यालून तो पेटवीत. अशा प्रकारचे दिवे अलास्कातील एस्किमो लोक व अल्यूशन बेटातील लोक वापरत.
भारतात अग्नीचे व पर्यायाने प्रकाशाचे ज्ञान माणसाला बऱ्याच काळापासून असावे असे दिसते. सतत धगधगणारे यज्ञकुंड त्या काळात माणसांचा मोठा आधार असे. त्यामुळे श्वापदांचा त्रास कमी होत असे. या आधाराच्या भावनेतूनच आर्यानी अग्नीला देवता कल्पिले असावे. ऋग्वेदात अग्नीला महत्त्व दिलेले आढळते. अग्नीचा शोध भृगू राजाने लावला, असा दावा वेदात करण्यात आलेला आहे.
रामायण आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांत दिव्यांचा उल्लेख असून तेथे काही ठिकाणी ते सोन्याचे व रत्नांचे असल्याचे म्हटले आहे. अति प्राचीन दिव्यांच्या आकार प्रकाराविषयी विशेष तपशील उपलब्ध नाही. पण मोहोंजोदाडो येथे मातीचे टांगण्याचे दिवे सापडले. ते इ.स.पूर्व ३७०० ते ३५०० या काळातले आहेत. ही सिंधू संस्कृती लोप पावल्यानंतर सोळाव्या सतराव्या शतकापासूनचे दिवे दक्षिण भारतात पाहावयास मिळतात, हे पितळ किंवा कासे या धातूंचे केलेले असून त्यावर नक्षीही कोरलेली आहे.
निरंजन, समई, ओवाळण्याचा दिवा आणि पंचारती हे भारतीय दिव्यांचे खास प्रकार. उत्तर भारतातील दिव्यांवर मोगल काळाचा मोठा परिणाम झालेला दिसतो.

दिवाळीच्या दिवसात लटकणारा आकाशदिवा लावतात. तो पितरांना प्रकाश देतो अशी जनमानसात समजूत आहे. आकाशदिव्यामुळे शिव, विष्णू आणि यम आदी देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात असा दावा पुराणात करण्यात आला आहे.
एकंदरीत, भारतीय जनजीवनात दिव्यांचं महत्त्व पूर्वापार चालत आलेलं आहे. पण फटाक्यांचं काय ? राम अयोध्येत परतला तेव्हा प्रजेने फटाके वाजवून स्वागत केलं, असं सापडतं का? अशोकाच्या विजयानंतर फटाके वाजवून विजय साजरा केला गेला, असे संदर्भ आहेत का ? फटाके भारतीय परंपरा आणि तीही हिंदू धर्माची परंपरा कधी झाली ? भारत स्वत: फटाक्यांच्या उद्योगात १९ व्या शतकात उतरलाय.
आज सणउत्सवांपासून ते अगदी बारसंलग्नांपर्यंत जो फटाक्यांचा गोंगाट केला जातो, तो कधीही भारतीय परंपरेचा भाग नव्हता. शोभेचं दारूकाम आणि फटाक्यांचा गोंगाट आपण इथे ठळकपणे लक्षात घेतला पाहिजे.

बंदुकीची दारू आणि इतर ज्वलनशील व वाफेच्या रूपात उडून जाणाऱ्या बाष्पनशील पदार्थांचे नियंत्रित रीतीने ज्वलन करून स्थिर अथवा गतीयुक्त लहानमोठे आवाज, विविध रंगी प्रकाश, धूर, ठिणग्या व ज्वाला इत्यादींच्या निर्मितीच्या प्रकियेला शोभेचे दारूकाम म्हणतात. या बाबींची संयुक्तपणे निर्मिती करून सुंदर आकृती व दृश्ये निर्माण करून असाधारण व प्रेक्षणीय आविष्कार दाखविले जातात. अशा प्रकारच्या शोभेच्या दारूकामासाठी लागणारी विविध साधने व सामग्री बनविण्याची आणि ती वापरण्याची कला व विज्ञान म्हणजे शोभेचे दारूकाम होय.
शोभेच्या दारुकामाचा ग्रीक अग्नी, सागरी अग्नी किंवा द्रवरूप अग्नी हा आविष्कार ६७० साली कॅलिनिकेस या अभियंत्यांनी बायझँटियमला आणला. बंदुकीच्या दारूचे मिश्रण भरलेली सिगारेटीएवढी नळी ११३० साली चीनमध्ये बनविली होती. ही अशी बंदुकीची दारू १२३० साली बाँबमध्ये वापरली गेली. तिच्या फटाक्यांमधील वापराचा उल्लेख रॉजर बेकन यांनी १२६७ मध्ये केला आहे.
आगलावे बाँब व इतर शस्त्रास्त्रे यांचा शोभेच्या दारूकामाशी जवळचा संबंध असल्याने यूरोपात अठराव्या शतकापर्यंत अशा सामगीची निर्मिती व प्रत्यक्ष वापर यांवर लष्कराचे नियंत्रण असे. उदा., इटलीमधील धार्मिक उत्सव, राज्याभिषेक, शाही विवाहसोहळे, विजयोत्सव यांतील शोभेच्या दारूकामाची देखभाल लष्कराकडे असे. भारतामध्ये पेशवे काळातील शोभेच्या दारूची आतषबाजीविषयी तत्कालीन कागदोपत्री काही नोंदी आढळतात. मात्र, शोभेच्या दारूकामाचे प्रयोग जलाशयावर किंवा जलाशयालगत केले जात असल्याचं आपल्याला दिसतं.

फटाके ही अलिकडची सवय आहे, परंपरा नव्हें. ज्यांना दिव्याच्या ज्योतीचं संयमी जळत राहून उजेड देणं झेपत नाही, त्यांना फटाक्यांच्या गोंगाटाचा क्षणिक आधार घ्यावा लागतो. परंपरा कधी मजबुरी नसावी. मजबुरी असेल तर ती परंपरा होऊ नये. तिचा शक्य तितक्या लवकर त्याग करणं योग्य !
काही वर्षे आपण फटाके वाजवून सणउत्सव, समारंभ साजरे केलेही असतील. जगभरात सगळेच करतात. पण आता आपण दाटीवाटीची वस्ती झाले आहोत. या घरातला फटाका उडून त्या घरात जाईल, इतके लगटून आहोत. मैदानं आपण गिळंकृत केली आहेत. संधी मिळेल तिथे वाहतुकीच्या रस्त्यांवर आपण मैदानी खेळ खेळतो. आपण इमारतीतून रस्त्यांवर पेटके फटाके फेकण्याइतपत उन्मादी बेशिस्त झाले आहोत. नियोजन चुकल्याने आपल्या शाळा, हाॅस्पिटलं एकाच चौकात असतात. चालायला पदपथ नाहीत. वाहनांचा आणि इतर पादचाऱ्यांचा धक्का चुकवत आपण वाट काढतो. अशा गर्दींच्या शहरात फटाके वाजवणं सार्वजनिकरित्या अपायकारक आहे, जोखमीचं आहे.

धुळींनी आपली शहरं आधीच माखलीत. विविध आजारांनी आपल्याला ग्रासलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला फटाक्यांवर पुनर्विचार करावा लागणार आहे, कारण फटाक्यांचं स्वरुप बदललंय. ते अधिकाधिक घातक होत चाललंय. फटाके उडवणं हे एक प्रकारे मेहनतीचा पैसा जाळण्यासारखं आहे. शिवाय, मोबदल्यात आपल्याला मिळते अनारोग्य आणि जीवाची जोखीम !
चीनी वस्तुंवर जितक्या सहजतेने आपण बहिष्काराची भाषा बोलतो, तितक्याच सहजतेने हा अपायकारक चीनी शोध आपल्याला नाकारता आला पाहिजे.
फटाके आपली परंपरा नाही ; धर्माशी फटाक्यांचा दुरान्वयेही काही संबंध नाही. पौराणिक कालबाह्य संदर्भ बाजूला ठेवले तर दाही दिशा दिव्यांनी उजळवून टाकणारा दिवाळी हा सण आहे. शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते हे जर भारतीयत्व असेल तर विद्वेषाला थारा न देणं हा आपला स्वभाव असला पाहिजे आणि मैत्रीभावना हा आपला धर्म असला पाहिजे. उजेडासाठी जळणे हा दिव्याचा गुणधर्म आहे. जाळणे दिव्याला नामंजूर आहे.
संदर्भ : मराठी विश्वकोश आणि विविध संकेतस्थळं