मतभिन्नता असली तरी संवाद हवा !

मतभिन्नता असली तरी संवाद हवा !

मतभिन्नता असली तरी संवाद हवा !

कायद्याने वागा लोकचळवळीत आरक्षण समर्थक आणि विरोधक दोन्ही विचारांचे लोक आहेत. पुरोगामी आणि हिंदुत्ववादीसुद्धा आहेत. मोदीसमर्थक लोकांनाही कायद्याने वागा लोकचळवळ आवडते. त्यांना ती चळवळ का आवडते, तर या सगळ्या मंडळींना देशात “काहीतरी” चांगलं व्हावं, असं वाटतं. पण ते “काहीतरी” काय आहे, हे त्यांना माहित नसतं. त्यांना जे “काहीतरी” चांगलं व्हावं, असं वाटत असतं, ते मोदीच करू शकतील, असं या लोकांना ठामपणे वाटत असतं. कारण मोदी नेहमी “काहीतरी” करत असतात.

ते देशाच्या भल्याचं नाही, असं मोदींचे विरोधक लोकांना सांगत असतात. हे सांगायचं काम परिणामकारकपणे कोणकोण करू शकतात, हे मोदींना ठाऊक असतं. मग ते आपल्या लोकांना कामगिरी सोपवतात. अमुक अमुक लोकांना बदनाम करा. त्यांना हिंदुविरोधी ठरवा. पाकिस्तानसमर्थक ठरवा.

उदाहरणार्थ, केंद्राने आॅगस्टच्या प्रारंभीच मंदिरं खुली करण्याला संमती दर्शवलीय. मोदींना चांगलं ठाऊक आहे की मंदिरं खुली करणं राज्यांना शक्य नाहीये आणि म्हणूनच त्यांनी मंदिरांना संमती दिलेली असते. मग मोदींचे राज्यातले लोक सर्वसामान्य श्रद्धांळुंना पुढे करून समाजमाध्यमात पुडी सोडतात. मंदिऱं खोलायला हवीत ! ज्यांना कोविड फैलावाची भीती असते, ते विरोध करतात. त्यांना धर्मविरोधी ठरवलं जातं.

राज्य सरकारही अडचण लक्षात घेऊन मंदिरं खोलायला तयार नसतं. मग ते सरकार धर्मविरोधी आहे, म्हणून प्रचार चालवला जातो. एखाद्याला न्यायालयात पाठवलं जातं. न्यायालय प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारचं म्हणणं मागवतं. सरकारचा विरोध मग प्रतिज्ञापत्रावर येतो. एखाद्या सुनावणीला न्यायाधीश बोलून जातात, मग तुम्ही दारूविक्रीला कशी दिली परवानगी ? ते वाक्य माध्यमांना हाताशी धरून मोठं केलं जातं. एकंदरीत, जो मोदींच्या विरोधात जातो, त्याची प्रतिमा सुनियोजितपणे अशी केली जाते की त्याने कितीही लोकांच्या भल्याचं सांगितलं, तरी लोकांची ऐकण्याची मानसिकताच नसते. अशावेळी परिवर्तनाची प्रक्रिया खडतर होऊन जाते.

सारासार विचार लोकांनाच करूदेत, निर्णय त्यांचे त्यांनाच घेऊदेत ! पण किमान लोकांनी तुम्हाला ऐकलं पाहिजे. इथे आपल्याला ना मोदींच्या विरोधात वैयक्तिक बोलायचंय, ना भाजपाच्या विरोधात ! आपल्याला देशातली सद्यस्थिती आहे तशी लोकांसमोर ठेवायचीय. त्यातून निष्कर्ष लोकांनाच काढूदेत.

मी माझ्या सोबतच्या आरक्षण विरोधकांना सांगतो, आधी आरक्षण काय आहे ते समजून घे, मग विरोध कर, तुझ्या मांडणीला धार येईल. तो वाचतो. त्याचा आरक्षण विरोध जरी कायम राहिला, तरी विखार कमी होतो, कटुता कमी होते. संवाद तिथून सुरू होतो. लोक अॅट्राॅसिटी कायद्याचा धाक दाखवतात. मला माहित असलेला अॅट्राॅसिटी कायदा दोन समाजात संवाद साधणारा आहे. आणि प्रत्यक्षात तो तसाच आहे. तुम्हाला तुमचं वर्तुळ मोठं करायचंय की संकुचित ठेवायचंय, यावर बरंच काही अवलंबून आहे.

हा सगळा विषय खूप आत आत जाणारा आहे. गेल्या अनेक वर्षात सामाजिक वातावरण इतकं कलुषित झालंय की ते एकाएकी निवळणारं नाही. न थकता संवाद ठेवावा लागेल. मी सांगतो तीच योग्य भूमिका, समोरच्याचं सगळंच चुकीचं ! हा हट्ट सोडावा लागेल. संवाद करायचा असेल तर मतभिन्नता असलेले लोक एकत्र वावरावे लागतील. त्यासाठीच कायद्याने वागा लोकचळवळ आहे, जिचा केंद्रबिंदू लोकांचे दैनंदिन जीवनमरणाचे प्रश्न आहेत. ईझमबिझमला आम्ही प्राधान्य देत नाही. आमचा ईझम भारतीय संविधान ! देश नीट समजावून सांगण्याचं ते एक परिणामकारक साधन आहे.

 

 

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक व मिडिया भारत न्यूज चे संपादक


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!