भारत जिंको वा हारो ; मोदीविरोधकांचा पराभव निश्चित !

भारत जिंको वा हारो ; मोदीविरोधकांचा पराभव निश्चित !

भारत जिंको वा हारो ; मोदीविरोधकांचा पराभव निश्चित !

आतल्या गाठीच्या लोकांसोबत लढताना खूप सावधगिरी, संयम, सतर्कता बाळगावी लागते. उन्माद काय उत्साहसुद्धा या लढाईत आत्मघातकी ठरू शकतो. हा आत्मघातकीपणा मोदीविरोधक अनेकदा करत आले आहेत. वैचारिक मांडणीतून जो परिणाम मोदीविरोधक साधतात, त्यावर कधीतरी पाणी फिरवण्याचं कामही तेच करताना दिसतात.

आजच्या क्रिकेटच्या मॅचचं घ्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अंतिम सामना भारतात गुजरातेत होतोय. त्या मॅचला नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. मॅच जिंकल्यावर ती मॅच मोदींच्याच करिष्म्यामुळे कशी जिंकता आली, याचे नरेटिव्हज तयार पडलेले असतील. कदाचित एखाद्या खेळाडूकडून मोदींच्या उपस्थितीमुळे 'आमचं मनोबल वाढलं', असंही वदवलं जाऊ शकतो.

मोदी गॅंग हे सगळं २०१४ च्या आधीपासून करत आलेली आहे. नायकांचं खलनायकीकरण आणि खलनायकांचं नायकीकरण ही इथली संस्कृती आहे. गुणवत्ता इथे कायम डावलली गेली आहे. बिनलायकीचे लोक केवळ जातीधर्माचा आधार घेऊन आपला टेंभा मिरवत आलेले आहेत. मोदींचं नेतृत्व याच पारंपारिक मानसिकतेवर स्वार झालेलं आहे. लोकांच्या भावभावनांशी खेळत मोदींचं राजकारण चाललेलं आहे. प्रश्न हा आहे की त्याला मोदीविरोधक का हातभार लावत आहेत?

अनेकदा 'थांबा, विचार करा, पुढे जा' हे सूत्र परिणामकारक ठरत असतं. मॅच काही तासांतच संपणार आहे. भारत जर ही मॅच जिंकला तर देशाच्या कौतुकाची संधी आपल्याकडे उरते. भारत जर मॅच हारला तर खेळाडुंच्या मेहनतीचं कौतुक करत खिळाडूपणाने हार स्वीकारत ऑस्ट्रेलियाचं अभिनंदन करणारा दिलदारपणा आपल्याला करता येतो.

गुजरातेत मॅच असल्यामुळे फिक्सिंग करून मोदी भारताला विजय मिळवून देणार आहेत आणि २०२४ ला तो विजय निवडणुकीत प्रपोगंडा करण्यासाठी वापरणार आहेत, ही मांडणी राजकीयदृष्ट्या अपरिपक्वतेची आणि मुत्सद्दीपणाचा अभाव असलेली आहे. ही मांडणी मोदींची नसलेली ताकद अधोरेखित करणारी आहे. मोदींचा प्रचार करणारी आहे.‌ मोदी काहीही करू शकतात; अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मनासारखा निर्णय आणू शकतात, हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर ठसवणारी ही अतिउत्साही मांडणी आहे. असं काही होणार असेल तरी मॅचचा निकाल लागेपर्यंत गप्प राहण्यातच शहाणपणा होता.

कदाचित ही मांडणीसुद्धा मोदींकडूनच पेरली गेली असण्याची आणि मोदीविरोधक तिची शिकार झाले असल्याचीही एक शक्यता उरतेच.

भारत मॅच हारला तर मोदींना 'मनहूस, अवदसा, काळी सावली, पनवती' वगैरे हिनवणं मोदीविरोधकांच्या विवेकवादाशी विसंगत ठरेल आणि भारतीय खेळाडुंनी अगदी आपल्या कौशल्यावर जरी मॅच जिंकली तरी श्रेय मोदींनाच मिळेल आणि हे श्रेय मोदींना मिळण्याचं श्रेय मोदीविरोधकांना असेल. दोन्ही बाजुंनी पराभव मोदीविरोधकांचाच झालेला असेल.‌

 

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!