टीका सहन करून राज्यकर्ते जनतेवर उपकार नाही करत !

टीका सहन करून राज्यकर्ते जनतेवर उपकार नाही करत !

टीका सहन करून राज्यकर्ते जनतेवर उपकार नाही करत !

तत्कालीन राज्यकर्ते केलेल्या टीकेचा मनमोकळेपणे आस्वाद घेत, ही कौतुकं आपण बंद करायला पाहिजेत. राज्यकर्त्यांवर लोकांचं लक्ष असतं, टीका होणार, कधी थेट कधी विनोदाने, ती सहन करून काही उपकार नाही करत राज्यकर्ते जनतेवर. तुम्ही जनतेचा थेट अपेक्षाभंग करायचा आणि लोकांनी टीकाही करायची नाही, केली तरी आडवळणाने, विनोदाची साखरपेरणी करून वगैरे करायची, त्यावरही यांचे बागडबिल्ले अंगावर धावून येणार… हे काय लाड आहेत? असा खडा सवाल मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेचा झिम्माड काव्यसमूह आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांनी मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कल्याणात रविवारी 'अभिकृती' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या अंतर्गत 'मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास' या मुकेश माचकर लिखित दीर्घांकाचं सादरीकरण करण्यात आलं.

तत्पूर्वी, नाटकाचे लेखक मुकेश माचकर आणि दिग्दर्शक मंगेश सातपुते यांची मुलाखत झिम्माड काव्यसमुहाच्या संचालक व महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी घेतली. सद्यस्थितीत अभिव्यक्तीच्या होत असलेल्या गळचेपीसंदर्भात दोघांनीही बिनधास्त उत्तरं दिली.

मुकेश माचकरांनी अगदी स्पष्ट सांगितलं की एकतर पु. ल. देशपांडे भाग्यवान आहेत की ते आजच्या काळात जिवंत नाहीत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींनी आज अनेकांच्या भावना आणि अस्मिता दुखावल्या गेल्या असत्या. ते प्रचंड ट्रोल झाले असते.

आमचा घोळीव इतिहास हा दीर्घांक म्हणजे पुलंच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या साहित्यकृतीचा, पुलंच्याच लेखनातले मास्तर आणि विद्यार्थी वापरून हसत खेळत परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात समकालीन राजकारण, समाजकारण, मराठी अस्मिता यांच्यावरचं भाष्य आहे, ते माझं. गंमतीची गोष्ट म्हणजे ही संहिता सेन्सॉरला गेली तेव्हा तिच्यात पन्नासेक कट्स सुचवले गेले होते आणि एकदोन सोडून बाकीचे सगळे कट्स पुलंच्या मूळ लेखनात सुचवले गेले होते…अशी माहिती माचकरांनी नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेवर बोलताना दिली.

पूर्वीच्या परिस्थितीवर बोलताना मंगेश सातपुते यांनी 'नक्षत्राचे देणे' मधल्या कवी मंगेश पाडगांवकरांच्या 'सलाम' कवितेचं उदाहरण दिलं. 'सलाम' पाडगावकर राजकीय नेत्यांसमोर सादर करू शकले होते व त्यांना समोरून दिलखुलास दाद मिळत होती, हे सातपुतेंनी अधोरेखित केलं. तत्कालीन राजकीय नेते समोर बसून आपल्यावर केलेल्या विडंबनाचा मोकळेपणाने आस्वाद घेत होते, आता तसं वातावरण राहिलं नाही, या सातपुतेंनी सांगितलेल्या प्रसंगावर मुकेश माचकर म्हणाले की ही कौतुकं आधी बंद करायला पाहिजेत. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुमच्यावर लोकांचं लक्ष असणार, टीका होणारच !

या मुलाखतीनंतर कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आणि सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर व इतर उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सत्कारमूर्तीत भिकू बारस्कर यांच्यासहित अशोक हंडोरे, सुधीर चित्ते, सुधाकर वसईकर, अभिजित झुंजारराव, आशुतोष मालती विद्याधर, डॉ. राजेंद्र राठोड, कविता मोरवणकर, आश्लेषा सोनाले, वैष्णवी आंबवणे, सायली पावसकर, कबीर जगताप यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक, सार्वजनिक वाचनालय कल्याण या संस्थेचे सचिव रंगकर्मी भिकू बारस्कर, झिम्माड सदस्य रंगकर्मी सुधीर चित्ते, जितेंद्र लाड, संध्या लगड आणि शालिनी आचार्य यांच्या संकल्पनेतून 'अभिकृती'चं आयोजन केलं गेलं होतं.

सुधीर चित्ते यांनी आपल्या दिलखुलास सूत्रसंचालनाने बहार आणली. सार्वजनिक वाचनालयाच्या सह ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर आणि सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे यांनी मंचावर तिसरी घंटा वाजवत कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.

लेखक पु. ल. देशपांडे यांच्या 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या पुस्तकावर आधारित मुकेश माचकरांच्या घोळीव इतिहास या नाटकातल्या चिमटे व भाष्यांनी हसवता हसवता रसिकांना अंतर्मुख केलं. मंगेश सातपुते यांनी मोठ्या ताकदीने नाटक उभं केलंय; तर, श्रेयस वैद्य, मेहुल भारती, मयुरेश खोले, गौरव कालुष्टे, वैष्णवी शेटे, वैदेही करमरकर हे कलावंत आपल्या अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवतात.

प्रयोगही ओव्हरफुल्ल गर्दीत रंगला. हंशा, टाळ्यांची दाद मिळाली. सात वर्षांच्या मुलीपासून सत्तरीतल्या आजोबांपर्यंत सगळे खळखळून हसले. मुलांनी प्रयोग चोख वाजवला आणि त्याला सभागृह उसळून दाद देत होतं...

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!