जे जे भाजपाला वाटते, सेम टू सेम आण्णांनाही वाटते !

जे जे भाजपाला वाटते, सेम टू सेम आण्णांनाही वाटते !

जे जे भाजपाला वाटते, सेम टू सेम आण्णांनाही वाटते !

सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता . ते उपोषण मागे घेऊन आता तीन महिन्यांचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिलेला आहे. हे करताना त्यांनी," मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही" असे विधान केले आहे.अपा जेंव्हापासून महाराष्ट्रात सत्तेपासून दूर झाली आहे, तेव्हापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करणे -अवमुल्यन करणे , महाराष्ट्राचा अपमान होत असताना टाळ्या पिटणे याच्यात मग्न आहेत. अण्णांनी केलेले विधान एखाद्या हिंदी चित्रपट अभिनेत्याने केले असते तर " पाकिस्तानात जा "! ( हल्ली अफगाणिस्तानात जा असेही म्हणतात ) म्हणत भक्त मंडळींनी सोशल मीडिया गाजून टाकला असता.

टुकार चित्रपट अभिनेत्रीच्या आडून भाजपाने महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या पोलिसांची, चित्रपट सृष्टीची यथेच्छ बदनामी करून झाली. मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा- गृहमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून निरनिराळ्या प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केला.. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रामुळे कोरोना देशात पसरला असे बेताल वक्तव्य स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीला मदत न करता कोणतेही ऑडिट न केल्या जाणाऱ्या आणि नवीनच बनवलेल्या पीएम. केअरला सढळ हस्ताने आर्थिक मदत महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी केली हे जनतेने विषण्ण मनाने पाहिलेले आहे .

आता अण्णांनी "तुमच्या राज्यात जगावेसे वाटत नाही" असे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे , असे मत लोकांचे होऊ लागले आहे . हे राज्य जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे राज्य आहे, हुकूम"शहांचे" राज्य नाही.

महा विकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या व भाजप सरकार येण्याच्या दर वेळी नवीन नवीन तारखा भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील देत असतात . त्यांच्या तारखांवर पण आता अण्णांना भरवसा उरला नाही असे वाटते.

अण्णांच्या ताज्या वक्तव्यामुळे अण्णांच्या काँग्रेस व काँग्रेस प्रणित सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचा वेगळा अर्थ लागायला सुरुवात झालेली आहे. अण्णांचे काँग्रेस सरकार विरोधातील उपोषण म्हणजे दुसर्‍या अर्थाने ते भाजपचे पालन-पोषण असते , हे 2011-12 च्या आंदोलनामुळे लोकांना समजलेले आहे.

अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या "सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या" निर्णयाला विरोध करुन तो निर्णय मागे घेण्यासंदर्भात 3 फेब्रुवारीला राज्य सरकारला पत्र पाठवले. 5 व 9 फेब्रुवारीला स्मरणपत्रे पाठवून 14 फेब्रुवारी ही आंदोलनाची तारीखदेखील जाहीर करून टाकली होती. काँग्रेस प्रणित सरकारच्या विरोधातील अण्णांची ही फास्टट्रॅक कार्यतत्परता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित करते.

7 नोव्हेंबर 2017 पासून 13 मार्च 2018 पर्यंत लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी जागा मागणारी 12 पत्रे अण्णांनी मोदींजींना पाठवली. पैकी एकाही पत्राला साधे उत्तर देण्याचे सौजन्यही मोदिंजीनी दाखवले नव्हते. त्यावेळी 23 मार्च पासून आंदोलन करण्याचा त्यांचा निर्धार होता..23 मार्चपर्यंत अण्णांनी लोकपाल तसेच जनहिताच्या विविध मुद्द्यांवर 43 पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली पैकी एकाही पत्राला मोदींनी उत्तर दिले नव्हते.

यूपीए-2 च्या विरोधात भाजपचा मुखवटा बनवून अण्णा हजारे यांनी आंदोलन केल्याची टिका त्यांच्याच पूर्वीच्या आंदोलनातील पूर्व सहकार्याने केल्याचे निरनिराळ्या माध्यमातून आपल्या वाचनात आलेले आहे .

देशातील किंबहुना जगातील सर्वात जास्त काळ चालले ठिय्या आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचे - 3 काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवरील आंदोलन होय. थंडी ,पाऊस, ऊन्हात, कोरोनाच्या साथीत व 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यूनंतरही जे आंदोलन चालले- त्यासाठी मोदी सरकार विरुद्ध राळेगणसिद्धीच्या सीमेवर तरी आपण लाक्षणिक उपोषण करावे असे अण्णांना वाटले होते किंवा काय ? काही स्मरत नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 2015 ते 2018 मध्ये 12,019 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा थापा मोदी सरकारने मारल्या होत्या ते 2022 साल आले तरी अण्णांना आंदोलन करण्याची इच्छा झाली नाही. गॅस व पेट्रोल ,डिझेल , डाळींनी , खाद्य तेलाच्या भाव वाढीने गरीब तसेच मध्यम वर्गाच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना जगणे कठीण झाले पण अण्णांनी मोदींजीना कोणते अल्टीमेटम दिल्याचे आठवत नाही.

कोरोनामध्ये लाखो मजूर उपाशी-तापाशी हजारो किलोमीटर चालत उत्तर प्रदेश -बिहार या राज्यांत गेले. त्यावेळी मोदींजीनी चुकीचा लॉक डाऊन लावला म्हणून अण्णा उपोषणाला बसणार ... असे काही वाचनात आले नाही.

गोमांस, हिंदू-मुस्लीम ह्या मुद्द्यावर खोटे राजकारण चालू असताना, हाथरस प्रकरण झाल्यावर, किंवा शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडणाऱ्या मंत्र्यांच्या लाडक्या मुलाविरुद्ध तरी अण्णा उपोषणाला बसले असावेत,असे वाटून बऱ्याच जणांनी जंतर-मंतर रामलीलावर एक फेरी मारून पाहिले. पण तिथे अण्णा कोणाला दिसले नाहीत .

2014 पासून भारतात बेकारी वाढलेली आहे. 2022 मध्ये तर आपण बेकारीत जागतीक रेकॉर्ड बनवत आहोत असे वातावरणआहे. तेंव्हा नोकरी मागणाऱ्या युवकांवर पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या रवानग्या भाजपा राज्यात तुरुंगात केल्या गेल्या तेंव्हा भाजपा युवा शक्ती व राष्ट्र शक्तीवर अन्याय करत आहे असे अण्णांना वाटले नाही.

संसदीय समिती द्वारे नवीन कायद्यांची चिकित्सा करण्याची पद्धत जवळजवळ बंद पडलेली आहे. चर्चेअभावी संख्याबळावर नवीन कायदे रेटण्याचे काम केंद्र सरकारने चालू केले आहे ..इलेक्ट्रॉल बाँड, पेगासस, राफेल, पंतप्रधान मदत निधी असताना पीएम केअर का बनवला गेला? व त्याला सीएजी च्या लेखापरीक्षणा बाहेर का ठेवले असावे? ह्या मुद्द्यांच्या विरोधात राळेगणसिद्धीला एखादा बॅनर लागल्याचे आठवत नाही .

मोदी सरकारवर- योगी सरकारवर टीका केली म्हणून काहीं पत्रकारांवर देशद्रोह व तत्सम कलमे लावली गेली. वर्ष झाले तरी काही पत्रकार तुरुंगात खितपत आहेत .गोरक्षणाच्या नावाखाली दुग्धव्यवसायातील शेतकरी- खाटिक, चामडयाशी निगडीत व्यवसायातील मुस्लिम ,दलित, आदिवासी समुदायावर हल्ले झाले, हत्या झाल्या. अभिव्यक्तिस्वातंत्र्य पणास लागले, पण अण्णा शांतच राहीले !

या सर्व प्रश्नांपेक्षा सुपर मार्केट मध्ये विकल्या जाणाऱ्या वाईन चा प्रश्न अण्णांना महत्वाचा वाटला. ह्या वाईन विक्रीमुळे महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होईल असे देवेंद्र फडणवीस यांना वाटते. जे भाजपाला वाटते ,जे आर एस एस ला वाटते, तेच सेम टू सेम अण्णांनाही वाटते

अण्णांच्या आंदोलनाला गोदी मिडीयाने दिलेल्या अवास्तव प्रसिद्धी पायी जनमत कृत्रिमरित्या काँग्रेसच्या विरोधात गेले. 2014 पासून देशातील निरनिराळ्या संस्था विक्री करून संपुष्टात आणण्याचे धोरण चालू आहे. एकही नवीन संस्था मोदींजींनी तयार केली नाही. मोदींजींच्याउद्योगपती मित्रांचे आणि कर्ज बुडवून देशाबाहेर पळणाऱ्यांचेच फक्त अच्छे दिन आले. देशाच्या नशिबात मात्र बुरे दिन आले. अण्णांना ह्यात काही वावगे दिसले नाही. जनतासापेक्ष प्रामाणिक आंदोलनाची शोकांतिका आहे. अण्णा तुम्ही आरोग्याची काळजी घ्या ! आपला वापर होऊ देऊ नका!

धर्मांध, अविवेकी, भांडवलशाहीच्या मांडीवर बसून गोदी मिडीयाच्या माध्यमातून राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आणि नवीन तारखा देणाऱ्यांना खरे तर सत्तेवाचून जगावेसे वाटत नाहिए ! हे सत्य आहे पण, बोलायचे कसे हा प्रश्न आहे...!!

 

 

 

धनंजय जुन्नरकर

प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
djunnarkar92@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!