भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने हैदराबादमध्ये येणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वागत एका वेगळ्याच पोस्टरबाजीने होतंय...
N Modi, We only rob banks...You rob whole nation ! असा मजकूर पोस्टरवर आहे. एन मोदी...आम्ही तरी बँक लुटतो, पण तुम्ही आख्खा देश लुटता ! असा त्या मजकुराचा अर्थ आहे.

या मजकुराची केवळ मोठमोठाली होर्डिंग्ज बनवून शहरात लावलेली नाहीत, तर हातात बॅनर्स घेऊन विशिष्ट वेशभूषा केलेले लोक चौकाचौकात उभे राहताहेत. विशेष करून बँका, एलआयसीसारख्या सार्वजनिक संस्था अशी ठिकाणं अज्ञात निदर्शकांनी उभं राहण्यासाठी निवडली आहेत.
#moneyheist टोळी म्हणून आंदोलनाचा हा अभिनव प्रकार तेलंगणात राज्यभर गाजतो आहे. Money Heist याच नावाच्या एका गाजलेल्या स्पॅनिश वेबसिरीजवरून ही कल्पना उचललीय.
जिथे जिथे असे लोक दिसताहेत, हैदराबादमधील नागरिक फोटो, विडिओ काढून सोशल मीडियात पोस्ट करताहेत.

या सगळ्या प्रकारामागे सत्ताधारी तेलंगना राष्ट्रीय समिती पक्ष व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मुख्यमंत्री खालच्या पातळीचं राजकारण करीत असल्याचं भाजयुमो नेता पीएम साई प्रसाद यांनी म्हटलंय.
टीआरएसचे सोशल मीडिया कन्वेनर वाय सतीश रेडी यांनी पलटवार केलाय की एन मोदी म्हणजे नीरव मोदीही असू शकतो.

भाजपाने इतकं अस्वस्थ व्हायचं कारण काय ? ते एन मोदी म्हणजे नरेंद्र मोदी का समजताहेत? त्यांचीही खात्री झालीय का की देशाला लुटणारे एन मोदी म्हणजे नरेंद्र मोदीच असू शकतात ! असा टोला त्यांनी लगावलाय.