अवघ्या दोन वर्षीय गणेशाच्या डोक्यावर प्रहार करतानाही जातीयवाद्यांना पाझर फुटला नाही…

अवघ्या दोन वर्षीय गणेशाच्या डोक्यावर प्रहार करतानाही जातीयवाद्यांना पाझर फुटला नाही…

अवघ्या दोन वर्षीय गणेशाच्या डोक्यावर प्रहार करतानाही जातीयवाद्यांना पाझर फुटला नाही…

जातीय माजासाठी बदनाम अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हिंदूधर्मीय  पारधी कुटुंबावरील अत्याचाराची ताजी घटना घडली असून, माणुसकीशून्य जातमाजोरड्यांनी एका महिलेवर व तिच्या कुटुंबावर शेतजमीनीच्या वादातून सिमेंट पोलने हल्ला केला. त्यात वडिलांच्या खांद्यावरचं गणेश काळखुशा काळे नावाचं दोन वर्षांचं लहान बाळ डोकं फुटून जागीच ठार झालं. पण जातीयवादी हल्लेखोरांना पाझर फुटला नाही. त्यांनी मारहाण सुरूच ठेवली. बाळाचे वडील आणि एक नातेवाईक महिला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत. अॅट्राॅसिटीविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल असून नाना आघाव, विष्णू आघाव सहित सर्व आरोपी अटकेत आहेत.

हिंदू धर्मातील पारधी समाजातील काळखुशा काळे आपली पत्नी, तीन वर्षांची मुलगी राधिका व दोन वर्षाचा मुलगा गणेशसह अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात भानगाव शिवाय येथे राहतो. त्याची तीन एकर शेतजमीन आहे. त्याच्या शेताला लागूनच नाना आघाव याची शेतजमीन आहे. दोघांचे एकमेकांविरोधात अतिक्रमणाचे आरोप आहेत. गेली तीन वर्षं त्यांच्यात वाद आहेत व प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

गुरूवारी ५ सप्टेंबर, २०१९ रोजी काळखुशा धावत घरी आला व बायको जमाला म्हणाला की नाना आघाव आपल्या शेतात त्याचे खांब रोवतोय व आपली जमीन हडपतोय. आपण शेताकडे जाऊ. दोन वर्षांचा गणेश तेव्हा काळखुशाच्या खांद्यावर होता. ते आपल्या शेतजमीनीकडे निघाले असता, त्यांना नाना आघाव, विष्णू आघाव व त्यांचे मुलगे आपल्याकडेच येताना दिसले. जवळ येताच त्यांनी हातातल्या सिमेंट खांबांनी दोघांना झोडपायला सुरूवात केली, अशी माहिती काळखुशाची पत्नी जया काळे हिने पोलिस तक्रारीत दिलीय.

पारध्यांचा आमच्या जमीनीत काही संबंध नाही, कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलाय, असं म्हणत जातीयवादी शिवीगाळ करत आघाव गुंडांनी काळखुशावर हल्ला चढवला. नवऱ्याच्या खांद्यावरचं भीतीने आकांत करणारं मूल घ्यायला जमा धावली, तोच ” पारध्यांच्या पुढच्या पिढ्याच संपवून टाकू” म्हणत नाना आघावने हातातल्या सिमेंट पोलने लहानग्या गणेशच्या डोक्यात घाव घातला. त्या माराने ते लहान बाळ रक्तबंबाळ होऊन जमीनीवर खाली पडून निपचित झालं आणि मग एकच आक्रोश सुरू झाला. पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ही माहिती मिळते.

भानगाव येथे नागरी हक्क संरक्षण विभागाच्या नाशिक परीक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना प्रशासन तुमच्या दुखात सहभागी असुन तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे, अजीत भोसले आदी उपस्थित होते.

पोलिसांनी नोंदविलेली तक्रार सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे यांनी फिर्यादी महिलेस वाचून दाखवली. तेच या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत.

अहमदनगर अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित झाला पाहिजे !!!

अहमदनगर जिल्ह्यात व श्रीगोंदा तालुक्यात जातीय अत्याचाराच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत यात खर्डा, सोनई, लिंपणगाव अशी अनेक उदाहरणे देता येतील. अनेकदा अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करण्यात यावा अशा मागण्या अनेकदा करण्यात आल्या मात्र ते होऊ शकले नाही. कोणत्याही घटनेच्या दोन नाही तर तीन बाजू असतात. तिसरी बाजू असते ती या आपल्या व्यवस्थेची. गेल्या पाच वर्षाच्या समाजकार्याच्या अनुभवातून मी खात्रीशीर पणे सांगू शकतो की ज्या ज्या वेळी दलित, आदिवासी, भटके विमुक्त समाजावर असे अन्याय अत्याचार  होतात, त्यावेळी पिडीत व्यक्ती व त्याचे कुटुंबीय कसे दोषी आहेत हे दाखविण्यासाठी ही व्यवस्था काम करत असते. पिडीत व्यक्तीवर, त्याच्या नातेवाईकांवर दबाव टाकणे, बहिष्कार टाकणे, पिडीत व्यक्ती जर महिला असेल तर तिचं चारित्र्य हनन करणे, पिडीत व्यक्ती जर आदिवासी पारधी किंवा भिल्ल समाजातील असेल तर चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल करणे, प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांचे फोन सुरु होतात आणि एवढ्यावर काही झाले नाही तर प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती आणि संख्येच्या बळावर तपास यंत्रणेपासून ते न्याय व्यवस्थेची दिशाभूल करणारी जी व्यवस्था आहे. आदिवासी पारधी समाज हा  विखुरलेला असून गुन्हेगारी जमातीची भूतकालीन पार्श्वभूमी, गरीबी, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, उदरनिर्वाहाच्या साधनांचा आभाव, पोलिसांचा सततचा ससेमिरा यामुळे आमच्या जातीला  समाजात नेहमीच दुय्यम वागणूक मिळत आली आहे. भानगाव येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून आदिवासी पारधी समाजावर सतत्याने होणारे अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलण्याची गरज आहे. पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरातील सर्व पारधी समाज एकवटला असुन लवकरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी व्यापक आंदोलन करणार आहेत…

प्रमोद काळे  श्रीगोंदा तालुका कार्याध्यक्ष,

वंचित बहुजन आघाडी

अनु. जाती जमातीवरील अन्याय अत्याचारास प्रतिबंध कायद्याच्या नावाने लोक खडे फोडतात, पण महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवणाऱ्या राज्यात बुरसट विचारसरणीचे माणुसकी विकून खाल्लेले लोक गावोगावी असतील तर देशात काय परिस्थिती असेल, यांची कल्पना येते.


आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद रकान्यात जरूर द्या.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!