प्रायोगिक रंगभूमीला परवानगी द्या ; अतुल पेठेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र !

प्रायोगिक रंगभूमीला परवानगी द्या ; अतुल पेठेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र !

प्रायोगिक रंगभूमीला परवानगी द्या ; अतुल पेठेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र !

सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे, असं प्रतिपादन करीत, निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावीत. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल, अशी मागणी नाटककार अतुल पेठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.

पेठेंनी मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र लिहिलंय. आमचे हे पत्र तुमच्यापर्यन्त पोहोचेल की नाही कल्पना नाही. अशी सुरुवात पेठेंनी केलीय.

 

ते म्हणतात, आम्ही सारे प्रायोगिक नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. त्याकरता आपला देश आणि आपले राज्य आपापल्या पातळीवर उपायही करू पाहात आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरता इथल्या नागरिकांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे मदत केली आहे. त्यात आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे.

कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे हेही आम्हाला कळत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे हेही आम्ही जाणत आहोत. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबतही आम्ही सहमत आहोत, असं पेठेंनी पत्रात म्हटलंय.

पण हे सर्व आता दीड वर्ष सुरू आहे. आधीपेक्षा आता थोडीफार सुधारणा होत आहे. लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे. लोक आता हॉटेलात काही दिवस का होईना, पण जाऊन जेवूखाऊ लागलेले आहेत, असं नमूद करून पेठे पुढे म्हणतात की बदलत्या या चित्रात सर्वांनी कोविडची काळजी घेणं अर्थातच आवश्यक आहे. त्याबाबत सतत जनजागृती होणं गरजेचं आहे.

या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत, याकडेही अतुल पेठेंनी लक्ष वेधलंय. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे, असं मत त्यांनी मांडलंय.

पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर आम्ही काही लोकांनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ,मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा आम्ही अनुभव घेतला आहे, असं स्पष्टपणे मांडत पेठे मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करतात की निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावी.. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल.

अतुल पेठे (पुणे) यांच्यासोबत या पत्रावर शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक), अभिजित झुंजारराव (मुंबई), अनिल कोष्टी (भुसावळ) आणि अनेक गावांतील रंगकर्मी यांचाही नामोल्लेख आहे.

५० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य अनुज्ञेय आहे. आता तसाच निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रायोगिक रंगभूमीच्या बाबतीत घेतील का, याकडे कलाक्षेत्राचं लक्ष लागून आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!