मताधिकारात कोणाही सामान्य कार्यकर्त्याला आमदार-खासदार बनवण्याची ताकद : राज असरोंडकर

मताधिकारात कोणाही सामान्य कार्यकर्त्याला आमदार-खासदार बनवण्याची ताकद : राज असरोंडकर

मताधिकारात कोणाही सामान्य कार्यकर्त्याला आमदार-खासदार बनवण्याची ताकद : राज असरोंडकर

तुमचं भवितव्य तुम्ही निवडणुकीत तुमचे लोकप्रतिनिधी काय लायकीचे निवडता यावर अवलंबून असतं. भपक्याच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या वस्तीतील आपल्यातलाच आपल्या पसंतीचा कोणाही सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, आमदार, खासदार बनवण्याची ताकद भारतीय संविधानाने मताधिकाराच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे, असं प्रतिपादन कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी दामिनी कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी केलं.

भारतीय संविधान दिनाचं निमित्त साधून कुर्ल्यातील न्यू भारत नगरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या दिपाली भोसले आणि युवराज डावरे यांच्या अथक परिश्रमातून आणि लोकवर्गणीतून वस्तीतील विधवा महिला, परितक्त्या आणि बालक यांच्या समस्या निवारणासाठी दामिनी सेंटरची उभारणी करण्यात आलीय. कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी दीप प्रज्वलन करून सेंटरचं उद्घाटन केलं.

कायद्याने वागा लोकचळवळीचे कायदा समन्वयक ॲड. भुजंग मोरे, ॲड. निलेश मोहिते, जनकल्याण सोशल फाऊंडेशनचे संतोष थोरात, "प्रयास" संस्थेचे मनोहर पानसेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा सनाताई मलिक यांनीही विशेष भेट देऊन पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज असरोंडकर यांनी कार्यक्रमास जमलेल्या महिला व नागरिकांना आपल्याला संविधानाने दिलेले कर्तव्य व अधिकार याबद्दल मार्गदर्शन केलं. दीवार सिनेमातला शशी कपूर ज्याप्रमाणे बडेजाव करणाऱ्या अमिताभला ठणकावून सांगतो की मेरे पास मां है, तसा धनदांडग्यांविरोधात लढताना सर्वसामान्य नागरिकांनीही ' मेरे साथ कानून है'  म्हणून बिनधास्त सांगितलं पाहिजे, पण त्या आधी आपले कायदेशीर हक्क समजून घेतले पाहिजेत, त्या कामी दामिनी सेंटर पूरक ठरू शकेल, असं राज असरोंडकर म्हणाले. 

ॲड. भुजंग मोरे यांनी न्याय आणि विधी प्राधिकरण मुंबई जिल्हा यांच्या माध्यमातून महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम कसा राबवला जातो आणि त्यामार्फत महिलांना कोणत्या योजना आणि फायदे मिळतील, याबद्दल मार्गदर्शन केलं.

जनकल्याण फाऊंडेशन चे संतोष थोरात यांनी घरेलू कामगार महिलांच्या शासकीय योजनांबद्दल व व त्याचे लाभ कसे घ्यावेत याबद्दल सविस्तर माहिती दिली.

दामिनी कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरच्या अध्यक्षा दिपाली भोसले व सचिव युवराज डावरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं व नागरिकांचे आभार मानताना, सेंटरच्या माध्यमातून घर कामगार महिला, विधवा परितक्त्या महिला व बालकांना कशी मदत करता येईल व काय लाभ मिळतील याची सविस्तर माहिती दिली.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!